हिंदजगार न्यूज प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे माजी सभागृह नेते आणि सध्या पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार हे ठाकरे शिवसेनेत २५ तारखेला मुंबईत ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत.ही बातमी ‘सरकारनामा’ने सर्वप्रथम दिली. त्यानंतर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्नही सुरू झाला असून, तो शहराध्यक्षांपासून थेट प्रदेशाध्यक्षांनीही केला. मात्र, त्याला यश आलेले नाही.
पवारे हे आपल्या निर्णयावर ठाम असून, २५ तारखेला शिवबंधन हाती बांधणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना आज पुन्हा केला. हा निर्णय ते २२ तारखेला पिंपरीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहेत. या वेळी ते आपले पद आणि पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहेत. त्यामुळे भाजपला उद्योगनगरीत मोठा धक्का बसणार असून, येत्या सर्व निवडणुकांचे समीकरणच काहीअंशी बदलणार आहे.कारण पवार हे गत टर्मला पिंपरी महापालिकेत सत्तारूढ पक्षनेते होते. त्यांनी २०१४ ला भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविलेली आहे. त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानंतर त्यांचे समर्थकही भाजप सोडणार असल्याचे समजते. पवार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्यासह पक्षाच्या दहा नेत्यांना त्यांनी दोन महिन्यांपूर्वी आपला मनोदय बोलून दाखवला होता. त्यानंतरही पक्षाने म्हणावी तशी त्याची दखल न घेतल्याने राजीनामा देऊन शिवसेना प्रवेशाचा निर्णय त्यांना घ्यावा लागला आहे.त्यासाठी त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , शिवसेना नेते खासदार संजय राऊत खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा झाली आहे. पळून जाऊन मी लग्न करीत नाही, ही पवारांची आपल्या निर्णयावरील प्रतिक्रिया खूप काही सांगून जात आहे. पक्षाला ब्लॅकमेल करण्यासाठी, काही तरी पदरात पाडून घेण्याकरिता ही खेळी असल्याचा होत असलेला आरोप त्यांनी साफ फेटाळून लावला.