हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – मराठी मालिकाविश्वात सध्या टीआरपी हा महत्त्वाचा झाला आहे. एखाद्या मालिकेला टीआरपी चांगला असेल तर ती मालिका जास्त काळ चालते. पण जर मालिकेला टीआरपी नसेल तर ती मालिका काही महिन्यात गुंडाळली जाते.अशाच दोन मालिकांनी दोन दिवसात अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. एक म्हणजे ‘कस्तुरी’ आणि दुसरी म्हणजे ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिका. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने या दोन्ही मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यामुळे प्रेक्षक वर्ग नाराज झाला असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शंकर महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेली ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही मालिका मे २०२२ला सुरू झाली होती. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. सुरुवातीला बालपणीच्या शंकर महाराजांची कथा दाखवण्यात आली. बालकलाकार आरुष बेडेकर याने बालपणीच्या शंकर महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानंतर यावर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात शंकर महाराज जीवनचरित्राच्या महाअध्यायाचा आरंभ झाला. मालिकेतील शंकर महाराज मोठे झाले. मोठ्या शंकर महाराजांची भूमिका अभिनेता संग्राम समेळने उत्तमरित्या निभावली. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी संग्राम तब्बल ९ महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहिला होता. काही दिवसांपूर्वीच तो घरी परतला. पण असं असताना कमी टीआरपीमुळे ही मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला. १४ ऑक्टोबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. पण आता प्रेक्षक वर्ग संताप व्यक्त करून वाहिनीचा जाहीर निषेध करत आहेत.