हिंदजागर न्यूज प्रतिनिधी,पुणे – नुकत्याच पुण्यात घडलेल्या एका प्रकारावरुन सध्या राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे विद्यापीठातील त्या घटनेमुळे अनेक दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. या घटनेमध्ये पोलिसांनीही तातडीने तपास चालू केला असून चौकशी सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातूनही त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात केलेल्या एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये या प्रकारावरून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे त्या पोस्टमध्ये ?
आपल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाडांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठा घडलेल्या त्या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उजव्या विचारांच्या गुंडांकडून विद्यार्थीनींना मारहाण करण्यात आली. न्यू सोशालिस्ट अल्टरनेटिव्हचे श्रावणी बुवा, निहारिका भोसले, प्रथम नाईक, आकाश नवटाके हे चौघेजण जात असताना त्यांना १५ जणांच्या जमावाने अडवले आणि मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर एक मोठा जमाव त्यांच्याभोवती जमा झाला आणि सगळ्यांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली’, असं आव्हाडांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
‘विनयभंगापासून कलम ३०७पर्यंतचे गुन्हे’
हे जातीद्वेषाचं प्रकरण आहे आणि हे आता महाराष्ट्रात वाढतंय. पोलिसांनी वेळीच याला आवर घातला नाही तर ही प्रकरणं अशीच वाढत राहतील. ज्या गुंडांनी या विद्यार्थी व विद्यार्थिनींवर हल्ला केला त्या सगळ्यांवर विनयभंगापासून ते कलम ३०७ पर्यंतचे सगळे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे’, असं आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.’पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये मुलींवर अशा प्रकारचे हल्ले होणे हे अपेक्षित नाही. पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्यांना योग्य ती शिक्षा द्यावी’, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं पुणे विद्यापीठात?
पुणे विद्यापीठात नुकतीच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ भाजपा कार्यकर्ते व स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांमध्येही बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला. मोदींविषयी वसतिगृहाच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याबद्दल अभाविपनं कारवाईची मागणी केली. या प्रकाराच्या निषेधार्थ भाजपानं मुख्य इमारतीसमोर आंदोलनही केलं. पण त्यानंतर सदस्य नोंदणी करत असलेल्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांची बाचाबाची झाली. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )