हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – पुण्यातील शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले माजी आमदार अनिल भोसले यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोट्यवधी रुपयांच्या या गैरव्यवहार प्रकरणात अनिल भोसले यांना तीन वर्षांनंतर जामीन मिळाला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार अनिल भोसले यांना तीन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई करत बँकेचे व्यवस्थापकांसह अनिल भोसले, त्यांच्या पत्नी आणि मंगलदास बांदल यांच्यासह सात जणांविरोधात आठ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत सुमारे ४३६ कोटी ४४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. तेव्हापासून अनिल भोसले हे तुरुंगात होते. याआधी उच्च न्यायालयाने अनिल भोसले यांचा जामीन ४ वेळा फेटाळला होता. अखेर न्यायालयाने काही अटी शर्ती टाकून जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, अनिल भोसले यांना जामीन मिळाला असला तरी याच प्रकरणात माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता अनिल भोसले यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तब्बल सोळा तासांच्या चौकशीनंतर ईडीने बुधवारी रात्री उशिरा मंगलदास बांदल यांना अटक केली आहे.
— गणेश मारुती जोशी.