हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना सहआरोपी करुन अटक न करण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या सांगण्यावरुन तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती २ लाख रुपये मागणार्या सहायक पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करत असताना पोलीस निरीक्षकांना संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडील व्हाईस रेकॉर्डर काढून घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संतोष सूर्यकांत क्षीरसागर असे या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ मध्ये तो कार्यरत आहे. याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांचा मित्र तानाजी शेलार यांचे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यात तक्रारदार यांना सहआरोपी करुन अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीहीर बहिरट यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या करीता सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर याने ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.
या तक्रारीची गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या रेंजहिल येथील कार्यालयात २१ मे रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात पंचासमक्ष तडजोडीअंती २ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा कारवाई होऊ शकली नव्हती. मात्र, लाचेची मागणी करण्यात आली असल्याने आता लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या या गुन्ह्यातील सहभागाबाबत अधिक तपास सुरु आहे. पोलीस उपअधीक्षक अनिल कटके याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले की, त्यावेळी कारवाई करीत असताना तक्रारदार याच्याविषयी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना संशय आला होता. त्यांनी तक्रारदाराकडील व्हॉईस रेकॉर्डर काढून घेतला होता. त्यामुळे पुढे कारवाई होऊ शकली नव्हती. या कारवाईत काही शंका असल्याने विधी विभागाचे मत मागविण्यात आले होते. त्यानंतर आता गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या सहभागाविषयी तपास करण्यात येत आहे.
— गणेश मारुती जोशी.