पुणे | हिंद जागर ऑनलाईन न्यूज पोर्टल – रेंज हिल्स येथील पुलाखाली पावसाळ्यात वारंवार साचणाऱ्या पाण्याच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी काँग्रेस महिला ब्लॉक अध्यक्षा सौ. रोहिणीताई गणेश बोरसे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ अनिल शिरोळे यांना नागरिकांच्या वतीने सविस्तर निवेदन दिले.या समस्येची गंभीर दखल घेत संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाहीला गती देण्यात येईल, असे आश्वासन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिल्याचे बोरसे यांनी सांगितले.
रेंज हिल्समधील संबंधित पूल आणि परिसर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय हद्दीत येतो. प्रत्येक पावसाळ्यात पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने पादचारी, दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांना मोठा अडथळा निर्माण होतो.
“रेंज हिल्स येथील पुलाखाली पावसाचे पाणी साचण्याची समस्या अत्यंत गंभीर असून ती नागरिकांच्या जीवित आणि सुरक्षिततेशी संबंधित आहे. या प्रश्नावर केवळ तात्पुरती उपाययोजना करून चालणार नाही. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची माझ्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक आयोजित करून तांत्रिक अडचणी समजून घेतल्या जातील. आवश्यक स्थळपाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कार्यवाहीला गती दिली जाईल.” – आमदार सिद्धार्थ शिरोळे
ही समस्या अनेक वर्षांपासून कायम असून, पाणी उपसणे किंवा तात्पुरती डागडुजी करण्यापलीकडे ठोस कार्यवाही झालेली नाही. पुढील पावसात परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असल्याने नागरिकांना दरवर्षी त्याच संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.पाण्याची पातळी अचानक वाढल्यास वाहने बंद पडणे, दुचाकी घसरणे, पादचारी वाहून जाणे, विद्युतधक्का बसणे किंवा रुग्णवाहिका अडकणे यांसारखी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्याऐवजी प्रशासनाने आताच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी ठाम भूमिका बोरसे यांनी मांडली.
“रेंज हिल्समधील नागरिक अनेक वर्षांपासून या समस्येचा त्रास सहन करत आहेत. प्रत्येक पावसाळ्यात पुलाखाली पाणी साचते; मात्र प्रशासनाकडून केवळ तात्पुरते उपाय केले जातात. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्याऐवजी आताच कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाचे तातडीने प्रत्यक्ष कार्यवाहीत रूपांतर व्हावे आणि कामाचे लेखी वेळापत्रक नागरिकांना मिळावे, ही आमची ठाम मागणी आहे.” – सौ. रोहिणीताई गणेश बोरसे ( काँग्रेस, महिला ब्लॉक अध्यक्ष, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड )
संयुक्त पाहणीसह तांत्रिक सर्वेक्षणाची मागणी
आमदारांच्या अध्यक्षतेखाली खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अभियंता, आरोग्य व पाणी-निचरा विभाग, वाहतूक पोलीस तसेच आवश्यकता असल्यास पुणे महापालिका, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक व प्रत्यक्ष स्थळपाहणी आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पावसाच्या पाण्याचा प्रवाह, नाल्यांची क्षमता, पाइपलाइन, कल्व्हर्ट, रस्त्याची पातळी आणि पाण्याच्या आउटफॉलचे तांत्रिक सर्वेक्षण करून मूळ कारणांचा लेखी अहवाल तयार करावा. त्यानंतर स्वतंत्र स्टॉर्म-वॉटर ड्रेनेज लाइन, नाल्याचे रुंदीकरण किंवा खोलीकरण, कल्व्हर्ट अथवा संपवेल-पंपिंग व्यवस्था यापैकी योग्य पर्याय तज्ज्ञांच्या सल्ल्याने राबवावा, अशी मागणी आहे.कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत मुसळधार पावसाच्या वेळी बॅरिकेडिंग, चेतावणी फलक, रात्रीची प्रकाशव्यवस्था, वाहतूक कर्मचारी आणि तत्काळ पाणी उपसा करण्याची यंत्रणा उपलब्ध ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने जबाबदार नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांचे नाव आणि संपर्क क्रमांक जाहीर करावा. स्थळपाहणी, तांत्रिक अहवाल, निधी, कार्यादेश आणि प्रत्यक्ष काम पूर्ण होण्याचे लेखी वेळापत्रक नागरिकांना द्यावे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.आमदारांनी संयुक्त बैठकीबाबत दिलेल्या आश्वासनानंतर या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्येवर आता ठोस आणि कालबद्ध कार्यवाही होईल, अशी अपेक्षा रेंज हिल्समधील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
बातमीदार : श्री. गणेश मारुती जोशी हिंदजागर ऑनलाईन न्यूज डिजिटल पोर्टल



