हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – आरटीई अंतर्गत प्रवेशित असलेल्या मुलांची शासनाकडून घेण्यात येणारी फी संस्था चालक यांना अदा करण्याबाबतचे आदेश काढण्याकरिता एक टक्के रक्कम म्हणजेच १२ हजार ६०० रुपयांची मागणी केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षण संचालनालय येथील मुख्य लिपीक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालनालय, सेंट्रल बिल्डींग कार्यालयात १६ ऑक्टोंबर रोजी करण्यात आली आहे.
सुनिता रामकृष्ण माने (वय ४६ वर्ष, पद-मुख्य लिपीक, प्राथमिक शिक्षण) असं ताब्यात घेण्यात आलेल्या लिपिक महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
याबबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांच्या कायम विना अनुदानित प्रकारच्या दोन शाळा आहेत. तिथे इयत्ता पहिली ते बारावीचे शिक्षण दिले जाते. तक्रारदार यांच्यावरील दोन्ही शाळेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आर.टी.ई. (RTE) अंतर्गत प्रवेशित असलेल्या बालकांना २५ टक्के प्रवेश देण्यात आलेला आहे. या प्रवेशाकरीता या मुलांच्या शिक्षणापोटी त्यांची फी ही शासनाकडून शाळांना देण्यात येते. त्यानुसार सन २०२३-२४ कालावधीत तक्रारदारांच्या दोन्ही शाळेत आर.टी.ई. अंतर्गत २५ टक्के प्रवेश दिलेल्या मुलांची १२ लाख ६९ हजार १४१ रुपये फी तक्रारदारास शासनाकडून येणे बाकी होते.
याबाबत उच्च न्यायालयाने शासनास आठ आठवड्याच्या आतमध्ये सदरची रक्कम फिर्यादी यांना देण्याबाबत ऑगस्ट २०२४ मध्ये आदेश दिला होता. त्याप्रमाणे शासनाने माहे सप्टेंबर २०२४ मध्ये रक्कमही रिलीज केली होती. सदर रक्कम तक्रारदार यांना अदा करण्याबाबतचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. नाशिक यांना आदेश काढण्याकरीता लोकसेवक श्रीमती सुनिता माने यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांना मिळणाऱ्या रकमेच्या १ टक्के म्हणजे १२ हजार ६०० रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.
या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक सुनिता माने यांनी तक्रारदार यांचेकडे १२ हजार ६०० रुपयांची लाच मागणी तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालय, सेंट्रल बिल्डींग, पुणे येथे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सुनिता माने यांना ताब्यात घेण्यात आलेले असून, त्यांचेविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अनिल कटके करत आहेत.
— प्रदीप कांबळे .