HindJagar News – Pune – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहेत. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवार निश्चितीसाठी जोर बैठका सुरू आहेत. पुढच्या काही तासांत पक्षांच्या उमेदवारी याद्या यायला सुरुवात होईल.
अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रचार सुरू होण्याआधीच पुण्यातून ५ कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून अंदाजे पाच कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. पुणे ते कोल्हापूर ह्या या दिशेने गाडी प्रवास करत होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता नियमानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार ही गाडी पुणे ते कोल्हापुर या दिशेने प्रवास करत होती. खेडशिवापूर टोलनाक्याजवळ पोलिसांनी गाडी पकडली. एका खासगी गाडीतून मोठी रक्कम नेली जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अतिशय शिताफीने गाडीतील रक्कम जप्त केली आहे.
संबंधित खासगी कार पोलिसांनी ताब्यात घेतलेली असून अंदाजे चार ते पाच कोटी रक्कम असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. जप्त केलेली रक्कम मोजण्याचे काम चौकीत सुरू आहे. यासंबंधी पुढील तपास पुणे पोलीस करीत आहेत.
एकीकडे निवडणुकीतला पैशांचा वापर कमी व्हावा, यासाठी निवडणूक आयोग सातत्याने प्रयत्न करीत असताना राजकीय पक्षांकडून वा नेत्यांकडून मात्र जनतेला ‘लक्ष्मी दर्शन’ होईल याची पुरेपूर सोय करण्यात येते आहे. याचाच प्रत्यय निवडणूक काळात कोट्यवधी रुपये जप्त होत असलेल्या कारवाईच्या वृत्तांनी येतो आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेली असून येत्या २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यांत राज्यात मतदान पार पडेल तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. २६ नोव्हेंबर रोजी विद्यमान महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार असल्याने २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर नवे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांना वेगवान हालचाली कराव्या लागतील.
—— विनोद वाघमारे