Hindjagarnews, Repoter – Pune – मोक्काच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने मेडिकल तपासणीवरून पुन्हा पोलीस ठाण्यात घेऊन जाताना बेड्यांमधून हात काढून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.गुंजन टॉकीज चौकात ही घटना सोमवारी रात्री घडली असून, येरवडा पोलिसांच्या ताब्यातून हा आरोपी पळाला आहे.
अटक आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे सातत्याने आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून जात असल्याचेही दिसत आहे. निखिल मधुकर कांबळे (२२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील कांबळे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यासह साथीदारांवर काही महिन्यांपूर्वी येरवडा पोलिसांनी एका गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. त्यानंतर त्याला अटकही केली होती. तो २५ ऑगस्टपासून येरवडा कारागृहात होता.
दरम्यान, १७ ऑक्टोंबर रोजी येरवडा पोलिसांनी एका गुन्ह्यात त्याचा पुन्हा ताबा घेतला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास करायचा होता. सोमवारी निखिल याच्या पोटात सकाळपासून दुखत असल्याचे सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी सायंकाळी त्याला ससून रुग्णालयात नेले. त्याची तपासणी केली. त्यावेळी गाडीमध्ये एकूण तीन आरोपी होते. तर, चालकासह तीन पोलीस कर्मचारी होते.
रात्री साडेनऊच्या सुमारास गाडी गुंजन चौकात आल्यानंतर आरोपी कांबळेने उलटी होत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी चौकात एका ठिकाणी गाडी थांबविली. पाठीमागचा दरवाजा उघडताच आरोपी कांबळेने काही कळायच्या आत गाडीतून बाहेर उडी मारत धूम ठोकली. हातातील बेडी काढून तो पळल्याचे समोर आले आहे. पोलीस आरोपी निखील याचा शोध घेत आहेत.
—– Ganesh Maruti Joshi.