HindJagar News – Repoter – Pune – विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विधानसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत बारामतीतून अजित पवार लढणार असल्याची घोषणा केली आहे.तर दुसरीकडे शरद पवार युगेंद्र पवारांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे 64 वर्षांपूर्वी बारामतीत जे घडलं त्याची पुनरावृत्ती होणार का? हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट…
काही दिवसांपूर्वी बारामतीतून निवडणूक लढणार नाही यावर अजितदादा ठाम होते. पण त्याच अजितदादांचं नाव उमेदवार यादीत पहिल्या क्रमांकावर बघून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. विधानसभेच्या बारामतीच्या जागेवरुन स्वत: अजितदादांनी आपली उमेदवारी घोषित केली आहे. आता प्रतीक्षा आहे ती महाविकासआघाडी आपली उमेदवार यादी कधी जाहीर करणार याची..तर तिकडे बारामतीत श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांना भेटल्याची माहिती आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी युगेंद्र पवार यांना बारामतीतून संधी देण्याची गळ शरद पवारांना घातल्याची चर्चा आहे. बारामती विधानसभा युगेंद्र पवारांनी लढवावी यासाठी समर्थकसुद्धा तयारीला लागलेत. काही दिवसांपूर्वी युगेंद्र पवारांच्या समर्थकांनी बारामतीत त्यांच्या आमदारकीचे बॅनरही झळकवले होते. खरंतर लोकसभा निवडणुकीपासूनच युगेंद्र पवार हे सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालंय.
युगेंद्र पवार नेमके कोण आहेत?
युगेंद्र पवार अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र म्हणजेच अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. युगेंद्र पवार यांच्या मातोश्री सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. युगेंद्र पवार बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित असतात. युगेंद्र गेल्या 3 वर्षांपासून मोर्फा या सेंद्रीय शेती उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या संघटनेच्या माध्यमातून युगेंद्र पवारांकडून मेळावेही आयोजित केले जातात.त्यामुळे 64 वर्षांनंतर पुन्हा पवार काका-पुतणे एकमेकांविरोधात उभे ठाकणार का या चर्चांना बारामतीत उधाण आलंय.
पण 64 वर्षांपूर्वी बारामतीत नेमकं काय घडलं होतं?
तर त्याचं झालं असं की 1960 मध्ये बारामती मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती. यावेळी ही निवडणूक यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शरद पवार यांचे मोठे बंधू वसंतराव पवारांना उमेदवारी देण्याची आली होती. याचवेळी शरद पवार यांनी काँग्रेसला मदत करत भावाविरोधात प्रचार केला होता. याचा परिणाम असा झाला की वसंतराव पवार पराभूत झाले आणि काँग्रेसचे गुलाबराव जेधे यांचा विजय झाला.
आता एक नजर टाकूया अजित पवार यांच्या कारकीर्दीवर..
अजित पवार 1991 पासून राजकारणात सक्रीय झाले. 1991 मध्येच अजितदादा बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडूनसुद्धा गेले. पण नंतर काका शरद पवारांसाठी अजित पवार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर सलग सहा वेळा अजित पवार विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. अजित पवार सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत.
आजही अजित पवार अनेकदा बारामती मतदारसंघात दौरा करतात. तिथल्या विकासकामांची ते आवर्जून पाहणी करतात. बारामतीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार जनता दरबार भरवतात. त्यामुळे बारामतीतला एक गट अजित पवारांच्या बाजूने असल्याचं लोकसभा निवडणुकीतही दिसून आलं. 2024ची विधानसभा निवडणूक बारामतीत पवार कुटुंबासाठी सोपी नसणारे. आपल्या सख्ख्या काकांविरोधात जर युगेंद्र पवार उभे राहिले तर पवार विरुद्ध पवार चुरस पुन्हा एकदा बारामतीकरांना बघायला मिळणार आहे. 64 वर्षांपूर्वी शरद पवारांनी जे केलं तेच आता पुन्हा होणार का? याचा फटका नेमक्या कुठल्या पवारांना बसू शकतो असं तुम्हाला वाटतं? हे आम्हाला कमेंट करुन सांगा..
—– Ganesh Maruti Joshi.