HindJagar News – Report – Mumbai – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनेसच्या 50 पेक्षा जास्त मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मनसेच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या पुत्राला मैदानात उतरवण्यात आलंय.
पुणे शहरातील मनसेच्या तीन उमेदवारांमध्ये मयुरेश वांजळे हे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मयुरेश वांजळे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी मयुरेश वांजळे खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
खडकवासला मतदारसंघातून निवडून येण्याचा विश्वास देखील मयुरेश वांजळे यांनी व्यक्त केला आहे. मला वडिलांची आठवण आल्यावर नेहमी रडू येतं. मात्र, मी रडणारा नाही, लढणारा आहे. मी माझे अश्रू दाबून ठेवले आहेत. आता ज्या दिवशी मी जिंकणार त्याच दिवशी रडणार, असं मयुरेश वांजळेंनी म्हटलं.
उमेदवारी देताना राज ठाकरे काय म्हणाले?, असं विचारल्यानंतर जसं वाघाचं काम होतं (रमेश वांजळे) तसंच तुझं काम आहे. तू याच कार्यपद्धतीने पुढे चालत रहा…, असं राज ठाकरे म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं.ज्यावेळेस मी राज ठाकरेंना भेटायला गेलो तेव्हा मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले, ते म्हणाले मला वाटलं माझा रमेशचं आला, अशी माहितीही मयुरेश वांजळे यांनी दिली.
दरम्यान, मयुरेश वांजळे यांनी राज ठाकरेंच्या मुंबईतील शिवतिर्थ बंगल्यावर जाऊन उमेदवारीसाठीचा एबी फॉर्म घेतला. यावेळी, राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी त्यांचं औक्षण केलं.
शर्मिला ठाकरेंनी अमित ठाकरेंचे औक्षण करताना मला ओवाळणीत आमदारकी हवीय, असं म्हटलं होतं. तर, मयुरेश वांजळेंचे औक्षण करतानाही विजयी भवं: अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
Repoter – Anurag Balchandra Salunke.