HindJagar News – Repoter – Pune – पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने पुणे जिल्ह्यातील एकूण 21 पैकी 10 विधानसभा मतदारसंघांतून तब्बल 20 जणांनी बंडखोरी केल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. काही बंडखोरांचे बंड शमविण्यात महायुती व महाआघाडीच्या नेत्यांनी यश मिळविले असून मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी आणखी काही जणांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.महायुती आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक तीन राजकीय पक्ष एकत्र आल्याने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांना उमेदवारी मिळू शकलेली नाही. काही ठिकाणी थेट पक्षात प्रचंड स्पर्धा होऊन उमेदवारी न मिळालेले अनेक इच्छुक नाराज झाले आहेत. त्यामुळे काहींनी थेट सोमवारी अर्ज दाखल करत बंडाचे अस्त्र उगारले.शहरात शिवाजीनगर, पर्वती, कसबा आणि हडपसर या मतदारसंघांतून बंडखोरांचे पेव फुटले आहे.
यात शिवाजीनगरमध्ये काँग्रेसने दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या मनीष आनंद यांनी बंडाचे अस्त्र उगारले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल केला. तर पर्वती मतदारसंघातही काँग्रेसकडून माजी विरोधी पक्षनेते आबा बागुल यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अर्ज दाखल केला आहे. तर येथील राष्ट्रवादी पवार गटाचे इच्छुक सचिन तावरे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
कसबा पेठमध्ये काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी पक्षाचा राजीनामा देत तिसर्या आघाडीकडून स्वराज्य पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हडपसरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद अलकुंटे यांनी बंडखोरी केली आहे. तर कोथरूड मतदारसंघात भाजपचे अमोल बालवडकर यांचे बंड थंड करण्यात भाजपला यश आले आहे.
पर्वती मतदारसंघातील भाजपचे श्रीनाथ भिमाले, कसबा पेठमध्ये शहराध्यक्ष धीरज घाटे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. तर वडगाव शेरी मतदारसंघात आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे नक्की काय भूमिका घेणार अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा अद्यापही कायम आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सिद्धार्थ शिरोळे यांनी, तर अपक्ष म्हणून मनीष आनंद यांनी उमेदवारी अर्ज सादर केला तर आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे दत्ता बहिरट यांनी हिंदजागर न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले ..
—— Ganesh Maruti Joshi.