HindJagar News – Repoter – PUNE – भाजपची विधानसभेसाठी पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघात होत असलेली बंडखोरी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने संपवली मात्र काँग्रेसचा घोळ मात्र अजूनही सुरूच आहे.
काँग्रेसला आपल्या बंडखोरांना शांत करण्यात यश आले नाही. त्यामुळे मविआची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे, काँग्रेसला बंडोबाचे बंड थंड करण्यात यश मिळतेय का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागलेय.
अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशीच शहरातील चित्र स्पष्ट होईल. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तीन तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उद्धव ठाकरे) असे प्रमुख ६ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून जास्त जण इच्छुक होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी शमवली. दुसरीकडे माविआमधील काँग्रेसचे मात्र बंडखोरी अजून संपली नाही. माजी महापौर कमल व्यवहारे, माजी उप महापौर आबा बागुल,काँग्रेस पदाधिकारी मनीष आनंद,काँग्रेसचे माजी नगरसेवक मुख्तार शेख यांनी कसबा विधानसभेतून पक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला आहे.याच मतदारसंघात पक्षाचे पदाधिकारी मुख्तार शेख यांनी बंडखोरी केली आहे.त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर आव्हान उभे केले आहे. माविआच्या स्थानिक शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी या सर्वांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे आज शेवटच्या दिवशी हे सर्व इच्छुक अर्ज परत घेतात काही पाहावं लागणार आहे.
उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख
पुणे शहरासह, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत तिकीट न मिळाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांकडून पक्षाचे आदेश डावलत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. हे अर्ज माघारी घेण्यासाठी आज अखेरचा दिवस असल्याने नाराजांची मनधरणी करण्यातच राजकीय नेत्यांची ऐन दिवाळीत धावपळ सुरू होती.
जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी बारामती आणि वडगावशेरी मतदारसंघ वगळता उर्वरित १९ मतदारसंघांत ५० पेक्षा जास्त नाराजांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यांचे अर्ज छाननीमध्येही पात्र ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी काहीही करून अर्ज मागे घ्यावेत यासाठी धावपळ सुरू आहे. शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्यांनी पक्षातील बंडखोरांना विनंतीवजा सूचना केली जात आहे.मात्र, त्याला नाराज किती प्रतिसाद देतात हे आज स्पष्ट होणार आहे.
——– Ganesh Maruti Joshi.