HindJagar News – Repoter – PUNE – मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं तुमची प्रॉपर्टी नाहीय. ते बाळासाहेब ठाकरेंचं आहे, असं राज ठाकरेंनी ठणकावलं होतं. यावर आता एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरमधील भाषणातून प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
शिवसेना कोणाची आहे हे लोकांनी ठरवलंय. धनुष्यबाण कोणाचं आहे, हे देखील ठरवलं आहे. बाळासाहेबांचं धनुष्यबाण, बाळासाहेबांची शिवसेना गहाण ठेवलेली, जी आम्ही वाचवली नसती तर काँग्रेसने विकून टाकली असती. धनुष्यबाण हे बाळासाहेबांचच आहे, त्यांनीच कमावलं आहे. परंतु आम्ही ते जिवापाड जपलं आहे. त्यासाठी आम्ही सत्ता सोडली, 8-10 मंत्र्यांनी सत्ता सोडली, 50 आमदारांनी सत्ता सोडली, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोल्हापूरमधील प्रचारसभेत एकनाथ शिंदे बोलत होते.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
चाळीस आमदार घेऊन जो म्होरक्या गेला त्यांना अजित पवारांचा त्रास होतो असं म्हणत होते . मग वर्षभरात ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची लाज वाटत होती तो अजित पवार मांडीत येऊन बसला. आता घुसमट होत नाही. या सगळ्यासाठी तुम्ही मतदान करायचं ? यांनी वाट्टेल ती थेरं करायची आणि तुम्ही बघत बसायचं ? तुम्ही मतदार नाही तर गुलाम आहात या असल्या लोकांचे… विचारांची प्रतारणा करणाऱ्यांना परत परत निवडून द्यायचं यासाठी जन्म झाला तुमचा ? निवडणुका आल्या की पैसे फेकले की परत येऊन मतदान करतील हा समज तुम्ही मोडणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राची परिस्थिती बदलणार नाही. महाराष्ट्रात फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण शरद पवारांनी सुरु केलं. महाराष्ट्रात त्यांनी अनेकदा पक्ष फोडले. पण गेल्या ५ वर्षात कळस गाठला. गेल्या ५ वर्षात आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह पण घेऊन गेले. शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गोष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे ती अजित पवारांची नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.
बाळासाहेबांच्या नावामागची हिंदुहृदयसम्राट ही उपाधीच उद्धव ठाकरेंनी काढून टाकली- राज ठाकरे
2019 ला तुम्ही ज्यांना मत दिलं ते नक्की कुठे आहे याचा विचार केलात का ? दोन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष ज्यांच्यातून विस्तव जात नसे ते पक्ष एकत्र आले आणि सत्तेत बसले. लोकांनी मतदान शिवसेना-भाजपला, काँग्रेस-राष्ट्रवादीला केल आणि इकडचा गट तिकडे गेला, तिकडचा गट इकडे आला. वाट्टेल तशा युत्या, आघाड्या झाल्या. आणि यांत काय घडलं तर बाळासाहेबांच्या नावामागची हिंदुहृदयसम्राट ही उपाधीच उद्धव ठाकरेंनी काढून टाकली. वैचारिक व्यभिचार किती करायचा? अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणत चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले, मुख्यमंत्री झाले, पुढे वर्षभरात अजित पवारच शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसले. यातून तुमच्या मताची लायकी काय आहे ते कळलं का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
——– Ganesh Maruti Joshi.