हिंदजागर प्रतिनिधी – ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती.
ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री किताबाने सन्मानित डॉक्टर श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा इथल्या त्यांच्या निवास्स्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदीर्घ काळापासून करत आहेत. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला. श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज परिवर्तनाचं कार्य त्यांच्याकडून गेली आठ दशकं सुरू आहे. 2019 मध्ये एबीपी माझानंही ‘माझा सन्मान’ देऊन आप्पासाहेबांना सन्मानित केलं होतं. आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं कार्य आप्पासाहेबांनी केलं आहे. त्यांचं हेच कार्य त्यांचे चिरंजीव सचिनदादा धर्माधिकारी करत आहेत. दासबोधावरील श्रवण बैठका महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होत आहेतच, शिवाय देशातील सर्व राज्ये आणि जगातील बहुतांश देशात हे कार्य सुरू आहे. अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेलं वृक्षारोपण आणि त्यांचं संवर्धन याची दखल संपूर्ण जगानं घेतली आहे. शिवाय रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, स्मशानभूमी आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहिरींमधील गाळ काढून स्वच्छ करणं, यासह अनेक कामं या माध्यमातून केली जातात. विशेष म्हणजे, यापूर्वी ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांनाही यापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
2008 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील 510 एकराच्या परिसरात 40 लाखांहून अधिक लोक जमा झाले होते. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये 2010 मध्ये नोंदही करण्यात आली होती.
- श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )