हिंदजागर प्रतिनिधी – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ सोमवारी दुपारी खोबरेल तेल वाहतूक करणारा टँकर उलटला.टँकरमधून खोबरेल तेल पडल्याने मोठ्या प्रमाणावर तेलाचे पाट वाहू लागले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून, माती टाकून निसरडा झालेला मार्ग पूर्ववत केला. सुदैवाने अपघातात जिवित हानी झाली नाही. मात्र रस्त्यावर तेल वाहून मार्ग निसरडा झाल्याने बाह्यवळण मार्गावरील वाहतूक कमालीची संथ झाली.
तामिळनाडूमधील कोईमतूरमधून २४ हजार लिटर खोबरे तेल घेऊन टँकर मुंबईकडे निघाला होता. नऱ्हे येथील भूमकर पुलावर टँकर चालकाचे सुटल्याने टँकर उलटला. गिअर बॉक्स निकामी झाल्याने टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने अपघातात जिवीतहानी झाली नाही. टँकरमधील तेल पसरल्याने महामार्ग निसरडा झाला. सिंहगड, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलिसांसह वाहतूक विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्याचबरोबर पुणे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ पोलीस, वाहतूक पोलीस आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मदतकार्य राबवल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र रस्त्यावर तेल वाहूम वाहतूक संथ झाल्याने बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. पाण्याचा मारा करून मार्ग स्वच्छ करण्यात आला. त्यावर माती टाकल्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
- श्री.विनोद वाघमारे ( प्रतिनिधी )