हिंदजागर प्रतिनिधी – जळगावच्या पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेमधून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला, तर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांचा उल्लेख गुलाबो गँग असा केला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘मी जे सांगितलं होतं तेच सभेत बोललं गेलं, त्या व्यतिरिक्त काहीही बोललं गेलं नाही. राऊत काय बोलले आपल्याला माहिती आहे, फक्त गुलाबो गँग बोलले आणि खाली बसले. कुठलंही व्हिजन नसलेलं काम त्यांनी केलं आहे. उद्धव साहेबांच्या बाबतीत आमचाराग नाही, पण ज्या माणसाने शिवसेना फोडली त्याच्याबद्दल आमचा राग आहे,’ असं गुलाबराव पाटील म्हणाले.
‘मला वाटतं, त्या माणसाच्या कानात सांगितलं असेल की शांत राहा, त्यामुळे संजय राऊत यांनी तीन मिनिटांमध्ये त्यांचं भाषण संपवलं. आमचा राजीनामा तयार ठेवा, हे ते सांगणारे कोण? आमच्या मतांवर मोठे झालेले लोक आहेत हे. उलट आम्ही म्हणतोय त्यांचा राजीनामा द्या. आमची 41 मतं घेतली, त्यांनी राजीनामा द्यायला हवा. स्वत: राजीनामा द्यायचा नाही आणि हलकटपणे वागायचं. राजीनामा देण्याची संजय राऊत यांची लायकी नाही आणि ते देणारही नाहीत,’ अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याने आमच्या प्रतिमेला कुठलाही धक्का लागणार नाही. दीड वर्षांनी आमदारकीच्या निवडणुका आहेत. राऊत यांनी इथे ठाण मांडून बसावं, हिंमत असेल तर. संजय राऊतांनी यावं आणि जळगाव ग्रामीणमध्ये निवडणूक लढवून दाखवावी, माझं चॅलेंज आहे त्यांना. कोण मर्द आणि कोण नामर्द. चारी मुंड्या चित करून जर बाळासाहेबांचा भगवा नाही घातला तर, नावाचा गुलाबराव नाही. शिवसेना बाळासाहेबांचीच आणि बाळासाहेबांचीच,’ असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं.
- श्री.विनोद वाघमारे ( प्रतिनिधी )