हिंदजागर प्रतिनिधी – सहजसुंदर अभिनय, आई-वहिणी, बहिणीचे ममत्व रुपेरी पडद्यावर जिवंत करणाऱ्या, ज्षेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे आज निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या.मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलसा. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान, सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी, नात- नातजावई असा परिवार आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृ्ष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाची अखेर झाली असल्याचे म्हटले जात आहे.
शनिवारी, 3 जून रोजी सुलोचना दीदी यांची तब्येत बिघडली आणि अशा स्थितीत त्यांना काल रात्रीपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मार्च महिन्यातही सुलोचना यांची तब्येत बिघडली होती आणि त्यानंतरही त्यांना श्वासोच्छवासाच्या आणि वयोमानाशी संबंधित इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र रुग्णालयात 3 आठवड्यांच्या उपचारानंतर त्या बऱ्या झाल्या. डॉक्टरांनी त्याला घरी परत पाठवले होते. सुलोचना दीदी यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याशिवाय, 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.बेळगावमध्ये 30 जुलै 1928 रोजी जन्म झालेल्या सुलोचना दीदी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1946 पासून केली. 1946 ते 1961 या काळात सासुरवास (1946), वहिनीच्या बांगड्या (1953), मीठ भाकर, सांगते ऐका (1959), लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. सुलोचना दीदी यांनी 250 हून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हिंदी चित्रपटात विशेष छाप
सुलोचना दीदी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका ताकदीने साकारली. एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी आपली छाप सोडली. देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑनस्क्रीन भूमिका साकारली होती. देव आनंद यांची भूमिका असलेल्या बऱ्याच चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये जब प्यार किसीसे होता है, प्यार मोहब्बत, दुनिया, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब. , वॉरंट आणि जोशिला आदी चित्रपटांचा समावेश आहे. राजेश खन्ना यांच्या दिल दौलत दुनिया, बहरों के सपने, डोली, कटी पतंग, मेरे जीवन साथी, प्रेम नगर, आक्रमन, भोला भला यांचा समावेश आहे. त्याग , आशिक हूँ बहरों का आणि अधिकार आदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. तर, हीरा, झुला, एक फूल चार कांटे, सुजाता, मेहरबान, चिराग, भाई बहन, रेश्मा और शेरा आदी चित्रपटांमध्ये त्यांनी सुनिल दत्त यांच्यासोबत भूमिका साकारली.