पुणेकरांच्या वाहनांवरील ‘एमएच-१२’ला तात्पुरता विराम; नव्या गाड्यांसाठी आता ‘एमएच-६१’!

3 Min Read

दुचाकी व चारचाकींच्या अंतिम मालिका संपल्या; तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत नोंदणी सुरू होण्याची शक्यता

हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | पुणे : पुणेकरांच्या वाहनांची वर्षानुवर्षे ओळख बनलेल्या ‘एमएच-१२’ नोंदणी मालिकेला सध्या तात्पुरता विराम मिळाला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी उपलब्ध असलेल्या शेवटच्या क्रमांक मालिका संपल्याने नवीन वाहनांच्या नोंदणी प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील नव्या वाहनांसाठी ‘एमएच-६१’ हा पर्यायी नोंदणी क्रमांक वापरण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकींसाठी सुरू असलेली ‘झेडझेड’, तर चारचाकी वाहनांसाठी असलेली ‘झेडडब्ल्यू’ ही अंतिम मालिका संपुष्टात आली आहे. त्यामुळे सोमवारी नवीन वाहनांची नोंदणी काही काळ ठप्प झाली. ऐन सणासुदीच्या काळात वाहन खरेदीदार आणि विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ‘एमएच-६१’ मालिकेला मान्यता देण्यात आली आहे.

‘वाहन’ प्रणालीमध्ये तांत्रिक बदल

नवीन मालिका मंजूर झाली असली तरी प्रत्यक्ष नोंदणी तत्काळ सुरू होणार नाही. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राकडून ‘वाहन’ प्रणालीमध्ये ‘एमएच-६१’ मालिकेचे तांत्रिक एकत्रीकरण आणि रोलआउट करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण दोन ते तीन दिवस लागू शकतात.

तांत्रिक काम सुरळीत आणि वेळेत पूर्ण झाल्यास पुढील दिवशीच नवीन मालिकेतील क्रमांकांचे वाटप सुरू होऊ शकते. अन्यथा वाहन खरेदीदारांना नोंदणी क्रमांक मिळण्यासाठी दोन ते तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागू शकते. परिणामी, शोरूममधून खरेदी झालेल्या नव्या वाहनांच्या प्रत्यक्ष वितरणालाही काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता आहे.

पुढे पुन्हा दिसणार ‘एमएच-१२ १ए’

पुण्यासाठी दीर्घकालीन पर्याय म्हणून ‘एमएच-१२ १ए’ या नव्या अक्षर-अंक मालिकेचा प्रस्ताव प्रक्रियेत आहे. मात्र, ही नवीन पद्धत कार्यान्वित करण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत ‘एमएच-६१’ ही तात्पुरती पर्यायी मालिका वापरण्यात येणार आहे.

‘एमएच-१२ १ए’ मालिका सुरू झाल्यानंतर ‘एमएच-६१’ अंतर्गत नोंदणी झालेल्या वाहनधारकांना नव्या मालिकेत क्रमांक बदलण्याचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि शुल्काबाबत परिवहन विभागाकडून स्वतंत्र मार्गदर्शक सूचना अपेक्षित आहेत.

जुन्या ‘एमएच-१२’ वाहनांवर कोणताही परिणाम नाही

यापूर्वी ‘एमएच-१२’ क्रमांकाने नोंदणी झालेल्या वाहनधारकांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या वाहनांचे विद्यमान क्रमांक कायम आणि वैध राहतील. ‘एमएच-६१’चा बदल केवळ नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांसाठी लागू असेल.

सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एमएच-६१’ मालिकेबाबतची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी तातडीने सुरू केली जाईल. संपूर्ण प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी साधारण दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे.

बातमीदार : पी. एस. सूर्यवंशी

Share This Article
Follow:
Welcome to Hindjagar News — हिंदजागर आणि आसपासच्या परिसरातील ताज्या बातम्या, अद्यतने आणि घडामोडींसाठी तुमचे विश्वसनीय माध्यम. आमचे ध्येय वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अचूक, वेळेवर आणि सहज समजण्याजोग्या बातम्या पुरवणे हे आहे. आम्ही स्थानिक कार्यक्रम, समुदायविषयक घडामोडी, शिक्षण, व्यवसाय, सरकारी कामकाज, सामाजिक मुद्दे, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्त्वपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करतो.
Leave a Comment