YODDHAA Defence Institute मारुंजी–हिंजवडी हॉस्टेललगत रिकामे बिअर कॅन; विद्यार्थ्यांचे भविष्य कोणाच्या भरवशावर ?? FDA–MPCBची गुप्त एन्ट्री; नियमभंग आढळल्यास परवानग्यांवर गंडांतर?

11 Min Read

YODDHAA  Defence Institute मारुंजी–हिंजवडी हॉस्टेललगत रिकामे बिअर कॅन; विद्यार्थ्यांचे भविष्य कोणाच्या भरवशावर ??  FDA–MPCBकडून गुप्त पाहणीचे आश्वासन; नियमभंग आढळल्यास संबंधित परवानग्यांवर कारवाईचे संकेत..Part – 1

मारुंजी–हिंजवडी | प्रतिनिधी, हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल – देशाच्या संरक्षण सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण आणि प्रशिक्षण घेतात. त्याच YODDHAA Defence Instituteच्या हॉस्टेलशी संबंधित परिसरात अनेक रिकामे बिअर कॅन आढळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टलकडे प्राप्त झालेल्या गुगल लोकेशन तसेच तारीख व वेळ नोंद असलेल्या व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये जाळीबंद कचरा साठवण जागेत अनेक रिकामे बिअर कॅन पडलेले दिसतात.उपलब्ध दृश्यांवरून मद्य कोणी सेवन केले किंवा कॅन कोणी टाकले, हे स्पष्ट होत नाही. विद्यार्थ्यांचा या कॅनशी संबंध असल्याचेही अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलशी संबंधित परिसरात अशा वस्तू आढळणे ही केवळ कचऱ्याची बाब म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही.

हा प्रश्न विद्यार्थ्यांना मिळणारे वातावरण, त्यांची सुरक्षितता, शिस्त, मानसिक स्वास्थ्य आणि त्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे.

माहिती देणाऱ्या पालकांची ओळख गोपनीय – या प्रकाराची माहिती देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी हिंदजागरकडे व्हिडिओ आणि छायाचित्रे दिली आहेत. मात्र त्यांची आणि संबंधित विद्यार्थ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली आहे.तक्रार केल्याची माहिती संस्थेला समजल्यास आपल्या मुलाला लक्ष्य केले जाऊ शकते, त्याला मानसिक किंवा शैक्षणिक त्रास दिला जाऊ शकतो आणि त्याच्या शिक्षणावर व भविष्यातील करिअरवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी गंभीर भीती संबंधित पालकांनी व्यक्त केली आहे.

ही पालकांनी व्यक्त केलेली भीती असून तिच्या सत्यतेबाबत कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. मात्र तक्रार करणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवणे आणि संबंधित विद्यार्थ्याच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, याची हमी देणे ही महाराष्ट्र शासनाच्या तपास यंत्रणेची जबाबदारी आहे.

मुलांच्या भवितव्याचा प्रश्न – डिफेन्स क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थी शारीरिक प्रशिक्षण, शैक्षणिक अभ्यास, मानसिक तयारी आणि कठोर शिस्तीचे पालन करतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व, सवयी आणि करिअर घडविण्यात निवासी परिसरातील वातावरण महत्त्वाची भूमिका बजावते.

रिकामे बिअर कॅन आढळल्याने विद्यार्थ्यांनी मद्यसेवन केले, असा निष्कर्ष काढता येत नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या निवासी परिसराशी संबंधित जागेत मद्याच्या रिकाम्या कॅनचा साठा दिसत असेल, तर बाहेरील वातावरणाचा विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही याची खात्री कोण देणार?

पालक आपल्या मुलांना मोठ्या अपेक्षेने, विश्वासाने आणि आर्थिक खर्च करून निवासी प्रशिक्षण संस्थेत पाठवतात. त्यांना केवळ वर्गखोल्या आणि प्रशिक्षण मैदान नव्हे, तर सुरक्षित, व्यसनमुक्त, शिस्तबद्ध आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे.

उद्या या वातावरणाचा एखाद्या विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर, अभ्यासावर किंवा करिअरवर विपरीत परिणाम झाला, तर त्याचे नुकसान भरून काढता येणार नाही. त्यामुळे शासनाने गंभीर घटना घडण्याची वाट न पाहता आताच वस्तुस्थिती तपासणे आवश्यक आहे.

“जागा भाड्याची; कॅन बाहेरील रहिवाशांचे”—संस्थेचे स्पष्टीकरण

या प्रकरणाबाबत संस्थेच्या वतीने श्री. कुंभार यांनी दूरध्वनीवर दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, संबंधित जागा भाडेतत्त्वावरील असून त्या परिसरात जमीनमालकाशी संबंधित बाहेरील नागरिकही राहतात. आढळलेले रिकामे बिअर कॅन संस्था किंवा विद्यार्थ्यांचे नसून बाहेरील रहिवाशांचे असावेत, असे त्यांनी सांगितले.

संस्थेची बाजू बातमीत नोंदविण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील सर्व प्रश्न आता संस्थेला नव्हे, तर निवासी प्रशिक्षण संस्था आणि हॉस्टेलला परवानगी देणाऱ्या तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या महाराष्ट्र शासनाला विचारले जात आहेत.

नुसती कागदपत्रे पाहून परवानगी दिली का?

विद्यार्थ्यांचे हॉस्टेल किंवा निवासी प्रशिक्षण व्यवस्था चालविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तपासणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र कागदपत्रांमध्ये दाखवलेली माहिती आणि प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती समान आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे.

संबंधित जागा भाड्याची आहे आणि त्याच परिसरात बाहेरील नागरिकही राहत असल्यास, परवानगी अथवा नोंदणी देण्यापूर्वी पुढील बाबींची प्रत्यक्ष पडताळणी झाली होती का?

* विद्यार्थी आणि बाहेरील रहिवाशांचे प्रवेशमार्ग स्वतंत्र आहेत का?

* विद्यार्थ्यांचा निवासी भाग सुरक्षित आणि स्वतंत्र व वेगवेगळे आहे का?

* बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशाची नोंद ठेवली जाते का?

* वॉर्डन आणि सुरक्षा कर्मचारी प्रत्यक्षात २४ तास उपस्थित असतात का?

* कचरा साठवण जागा विद्यार्थ्यांच्या निवासी भागापासून सुरक्षित अंतरावर आहे का?

* हॉस्टेल, मेस आणि स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली का?

* इमारतीला निवासी किंवा हॉस्टेल वापराची अधिकृत परवानगी आहे का?

* अग्निसुरक्षा, पाणी आणि सांडपाणी व्यवस्थेची तपासणी झाली का?

परवानगी देताना केवळ अर्ज, नकाशे, प्रतिज्ञापत्रे आणि प्रमाणपत्रे पाहण्यात आली की अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थिती तपासली, याचा खुलासा महाराष्ट्र शासनाने करावा.

FDA–MPCBकडून गुप्त पाहणीचे आश्वासन

या प्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर देण्यात आली आहे.

हिंदजागरशी झालेल्या दूरध्वनीवरील संवादात संबंधित अधिकाऱ्यांनी संस्थेला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक आणि गोपनीय पद्धतीने प्रत्यक्ष जागा पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

ही तपासणी केवळ रिकाम्या बिअर कॅनपुरती मर्यादित न ठेवता पुढील बाबींचीही तपासणी होणे आवश्यक आहे

  • * मेस आणि स्वयंपाकघराची स्वच्छता
  • * अन्नसुरक्षा नोंदणी आणि परवाने
  • * विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा
  • * पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता
  • * अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची तपासणी
  • * स्वच्छतागृह आणि सांडपाणी व्यवस्था
  • * ओला-सुका कचरा वर्गीकरण
  • * रिकामे कॅन आणि इतर कचऱ्याची विल्हेवाट
  • * बाहेरील व्यक्तींचा वावर
  • * विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि निवासी वातावरण
  • * अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्था
  • * STP प्लांट जाग्यावरती आहे का आणि  Consent To Operat आणि Consent To Establish कधी घेतला आहे

तपासणीत  तथ्ये किंवा ग नियमभंग आढळल्यास आपापल्या अधिकारक्षेत्रातील नोंदणी, अन्न परवाना अथवा पर्यावरणविषयक परवानगी निलंबित किंवा रद्द करण्यासह नियमानुसार कारवाई केली जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती आहे.

कोणत्या विभागाची काय जबाबदारी?

FDA, MPCB आणि हॉस्टेलला परवानगी देणाऱ्या यंत्रणेचे अधिकार वेगवेगळे असू शकतात.

FDAकडे मेस, स्वयंपाकघर, अन्नाचा दर्जा, अन्नसुरक्षा नोंदणी आणि खाद्यपदार्थांचे नमुने तपासण्याचे अधिकार आहेत. नियमभंग आढळल्यास संबंधित अन्न परवाना निलंबित किंवा रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

MPCB कडून सांडपाणी व STP प्लांटची व सादर ठिकाणी Consent To Operat आणि Consent To Establish कधी घेतले आहे का व ते नियमित चालले आहे का व मागील तीन वर्षांपासून त्याची MPCB कार्यालयाकडून विजिट झाली आहे का याची पाहणी करून घ्यावी व तो अहवाल  MPCB च्या पोर्टल वरती जाहीर करावा, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणविषयक नियम आणि लागू असल्यास संबंधित संमती किंवा परवानग्यांची तपासणी केली जाऊ शकते.

इमारतीचा हॉस्टेल म्हणून वापर, बांधकाम परवानगी, वापर प्रमाणपत्र, अग्निसुरक्षा आणि प्रशिक्षण संस्थेची नोंदणी यांची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, नियोजन प्राधिकरण, शिक्षण विभाग, अग्निशमन विभाग किंवा अन्य सक्षम प्राधिकरणाकडे असू शकते.त्यामुळे नियमभंग आढळल्यास नेमकी कोणती परवानगी रद्द केली जाणार, कोणत्या विभागाकडून कारवाई केली जाणार आणि विद्यार्थ्यांच्या निवासी व्यवस्थेबाबत अंतिम निर्णय कोण घेणार, हे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट करावे.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे काय भूमिका घेणार?

मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅन्टीनची अचानक तपासणी करणारे FDA आयुक्त तुकाराम मुंढे आता पुण्यातील या निवासी डिफेन्स इन्स्टिट्यूटच्या मेस, स्वयंपाकघर, भोजन आणि पाण्याची गुप्त तपासणी करण्याचे आदेश देणार का?

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भवितव्याचा प्रश्न असल्यामुळे या प्रकरणातही त्याच कठोर व निष्पक्ष कार्यपद्धतीने तपासणी केली जाईल का, याकडे लक्ष लागले आहे.

हिंदजागरचे महाराष्ट्र शासनाला दहा थेट सवाल

1. YODDHAA Defence Instituteच्या हॉस्टेलशी संबंधित परिसराला परवानगी किंवा नोंदणी देण्यापूर्वी प्रत्यक्ष जागा पाहणी करण्यात आली होती का?

2. परवानगी देताना अधिकाऱ्यांनी केवळ कागदपत्रे तपासली की विद्यार्थी राहत असलेल्या संपूर्ण परिसराची प्रत्यक्ष स्थिती पडताळली?

3. विद्यार्थी आणि बाहेरील रहिवासी एकाच परिसरात राहत असल्याची माहिती परवानगी देणाऱ्या विभागाला होती का?

4. विद्यार्थी आणि बाहेरील नागरिकांचे निवासी भाग, प्रवेशद्वार आणि कचरा साठवण व्यवस्था स्वतंत्र असल्याची खात्री कोणत्या अधिकाऱ्याने केली?

5. हॉस्टेल, मेस, अग्निसुरक्षा, बांधकाम वापर, पाणी, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित सर्व परवानग्या वैध आहेत का?

6. संबंधित जागेची शेवटची अधिकृत तपासणी कधी आणि कोणत्या विभागाने केली? त्या तपासणीचा लेखी अहवाल उपलब्ध आहे का?

7. तक्रार करणाऱ्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची ओळख गोपनीय ठेवून संबंधित विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची हमी शासन देणार का?

8. FDA आयुक्त तुकाराम मुंढे पुणे विभागाला पूर्वसूचना न देता अचानक अन्नसुरक्षा तपासणी करण्याचे आदेश देणार का?

9. तपासणीत गंभीर नियमभंग आढळल्यास संबंधित परवाने निलंबित किंवा रद्द करून परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार का?

10. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, मानसिक स्वास्थ्यावर किंवा करिअरवर विपरीत परिणाम होण्यापूर्वी महाराष्ट्र शासन तातडीने हस्तक्षेप करणार की गंभीर घटना घडण्याची वाट पाहणार?

 पूर्वसूचना न देता संयुक्त पाहणीची मागणी- संस्थेला आगाऊ माहिती देऊन नियोजित पाहणी केल्यास प्रत्यक्ष परिस्थितीत तात्पुरते बदल केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे FDA, MPCB, संबंधित स्थानिक प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक संयुक्त पाहणी करावी, अशी हिंदजागरची मागणी आहे.पाहणीदरम्यान व्हिडिओमध्ये दिसणारी जागा, सीसीटीव्ही नोंदी, प्रवेश नोंदवही, कचरा व्यवस्थापन, मेस, स्वयंपाकघर, पाणी, सुरक्षा व्यवस्था आणि सर्व आवश्यक परवानग्यांची प्रत्यक्ष पडताळणी करावी.

तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा लेखी अहवाल सार्वजनिक करण्यात यावा. संबंधित परवानग्यांवर कारवाई करून, परवानगी देताना प्रत्यक्ष पाहणी न करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी.

हिंदजागरचा महाराष्ट्र शासनाला रोखठोक सवाल—विद्यार्थ्यांचे भविष्य आणि सुरक्षितता पणाला लागलेली असताना परवानगी देण्यासाठी केवळ कागदपत्रे पुरेशी आहेत का? प्रत्यक्ष जागा, तेथील वातावरण आणि मुलांचे भवितव्य पाहण्याची जबाबदारी शासनाची नाही का?

स्पष्टीकरण– उपलब्ध व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये रिकामे बिअर कॅन दिसत असले तरी ते कोणी वापरले किंवा विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी संबंध आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. या बातमीत कोणत्याही विद्यार्थ्यावर मद्यसेवनाचा आरोप करण्यात आलेला नाही. प्रकरणातील अंतिम सत्यता FDA, MPCB आणि इतर सक्षम सरकारी यंत्रणांच्या प्रत्यक्ष तपासणीनंतरच स्पष्ट होईल.

  • YODDHAA Defence Instituteच्या हॉस्टेलशी संबंधित परिसरात अनेक रिकामे बिअर कॅन आढळल्याचा प्रकार समोर.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांनी गुगल लोकेशन, तारीख व वेळ नोंद असलेले व्हिडिओ आणि छायाचित्रे हिंदजागरकडे दिली.
  • नाव उघड झाल्यास आपल्या मुलाला संस्थेकडून लक्ष्य करून त्रास दिला जाऊ शकतो आणि त्याच्या शिक्षणावर व करिअरवर परिणाम होऊ शकतो, अशी पालकांना भीती.
  • FDA आणि MPCB अधिकाऱ्यांकडून पूर्वसूचना न देता गुप्त भेट देऊन प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आश्वासन.
  • नियमभंग आढळल्यास आपापल्या अधिकारक्षेत्रातील परवाने किंवा नोंदणी निलंबित अथवा रद्द करण्यासह कारवाईचे संकेत.
  • हिंदजागरचे सर्व प्रश्न संस्था नव्हे, तर परवानगी आणि नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र शासनाला.

लवकरच भाग २ न्यूज मालिका 

HindJagar Online News PORTAL, Pune.

TAGGED:
Share This Article
Follow:
Welcome to Hindjagar News — हिंदजागर आणि आसपासच्या परिसरातील ताज्या बातम्या, अद्यतने आणि घडामोडींसाठी तुमचे विश्वसनीय माध्यम. आमचे ध्येय वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अचूक, वेळेवर आणि सहज समजण्याजोग्या बातम्या पुरवणे हे आहे. आम्ही स्थानिक कार्यक्रम, समुदायविषयक घडामोडी, शिक्षण, व्यवसाय, सरकारी कामकाज, सामाजिक मुद्दे, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्त्वपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करतो.
Leave a Comment