हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – संभाजी पोलिस चौकीच्या मागे नियमबाह्यपणे होर्डिंग लावल्याने तीन परवाना निरक्षकांना निलंबित केले. मात्र, संबंधित होर्डिंग व्यावसायिकाने महापालिकेस अपेक्षीत असलेले खुलासे अद्याप केले नाहीत.ही मुदत उलटून गेली तरीही कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणात कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडूनही बघ्याची भूमिका घेतली जात आहे.संभाजी पोलिस चौकीच्या पाठीमागे आकाश चिन्ह विभागाने होर्डिंगला परवानगी दिल्यानंतर नियमबाह्यपणे तीन होर्डिंग उभे केले. याबाबत तक्रार आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी प्रत्यक्ष जागा पाहणी केली.त्यामध्ये तेथे वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे जागा मोजणी नकाशा, पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र, ही जागा नदीपात्रात असल्याने पूर रेषेबाबत पाटबंधारे विभागाचा अभिप्राय, ही जमीन महापालिकेच्या मालकीची आहे की नाही, याची खात्री करण्याबाबत खुलासा करण्याचे आदेश संबंधित व्यावसायिकास दिले होते. पण, त्याबाबत महापालिकेला अद्याप काही कागदपत्र मिळालेले नाहीत.
आकाश चिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ”संभाजी पोलिस चौकीमागील होर्डिंगसंदर्भात तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पण, संबंधित व्यावसायिकाने आक्षेपांबाबत खुलासा न केल्याने त्यावरही कारवाई करून हे होर्डिंग काढले जातील.