हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मंगळवारी (१० ऑक्टोबर) एक भयानक घटना घडली. आळे गावातील तितर मळ्यात अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला.या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला. दरम्यान, विरह सहन न झाल्याने त्याच्या आईने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. शिल्पा भुजबळ असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईचे नाव आहे. बिबट्याची वाढती संख्या आणि दहशतीविरोधात संताप व्यक्त करत या महिलेने आक्रोश केला. लवकरात लवकर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी सुद्धा या महिलेने केली आहे.
नेमकं काय घडलं होतं ?
शिवांश भुजबळ हा ४ वर्षाचा चिमुकला अंगणात खेळत असताना ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्या शिवांशची मान पकडून त्याला नेऊ लागला. आरडाओरड झाली असता, एका तरुणाने मोठ्या हिंमतीने बिबट्याचा पाठलाग केला. त्याने शिवांशला बिबट्याच्या जबड्यातून सोडवून आणलं.जखमी अवस्थेत असलेल्या शिवांशला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना शिवांशचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवांशच्या मृत्युनंतर आळे गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.दुसरीकडे शिवांशच्या मृत्युने त्याची आई शिल्पा यांना जबर धक्का बसला. आपल्या पोटच्या गोळ्याच्या मृत्युचा धक्का सहन न झाल्याने आईने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत असून वनविभागाच्या कारभारविरोधात संतापाची लाट उसळली आहे.