हिंदजागर प्रतिनिधी – बालभारती पौडफाटा रस्ता, दोन बोगदे या प्रकल्पांना पुण्याच्या विकास आराखड्यातून काढून टाकणे, वेताळ टेकडी नैसर्गिक वारसा जाहीर करून पूर्ण टेकडीला शून्य विकास क्षेत्र घोषित करावे, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याची मागणी वेताळ टेकडी बचाव कृती समितीने केली आहे.तसेच वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला वेताळबाबा चौक ते खांडेकर चौक या मार्गावर जनजागृती पदयात्रा आयोजित करण्यात आली असून, राजकीय पक्षही यात सहभागी होणार आहेत. वेताळ टेकडी बचाव कृती समितीचे प्रदीप घुमरे, हर्षद अभ्यंकर, सुमिता काळे, डॉ. सुषमा दाते, खासदार वंदना चव्हाण यांनी या बाबत माहिती दिली.
वेताळ टेकडी आणि त्यावरील जंगल हे हवामान बदलांपासून संरक्षक कवच आहे. जैवविविधता राखणे, हवेची गुणवत्ता सुधारणे, भूजल साठा वाढवणे, उष्ण क्षेत्राचा परिणाम कमी करणे असे अनेक फायदे आहेत. प्रकल्पामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पुण्याच्या टेकड्या शून्य विकास क्षेत्र घोषित करणे आवश्यक झाले आहे. पर्यावरण विरुद्ध विकास असा हा वाद नसून तर अकार्यक्षम शासन व्यवस्थेविषयी आहे. अनेकदा विनंती करूनही पुणे महापालिकेने कोणतेही अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले नाहीत, असे समितीच्या सदस्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे राजकीय पक्ष आणि संघटना पदयात्रेत सहभागी होणार आहेत. मात्र ते राजकीय पक्ष, चिन्ह घेणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले.
चव्हाण म्हणाल्या, की पुण्यातील टेकड्या शहराचे फुफ्फुस आहेत. टेकड्या फोडून लचके तोडले जात आहेत. हे प्रकार थांबले पाहिजेत. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन या प्रकल्पांना विरोध आहे.
=== श्री.गणेश मारुती जोशी ( स्थानिक वार्ताहार ) ===