आळंदीच्या ‘विनर्स अकॅडमी’ची दिवेआगर सहल ठरली काळरात्र; समुद्रात बुडून ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, पालकांचा आक्रोश — सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

2 Min Read

हिंदजागर ऑनलाइन न्यूज पोर्टल / आळंदी | बातमीदार – आनंद, उत्साह आणि नव्या आठवणी घेऊन आळंदीहून दिवेआगरच्या सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांवर नियतीने घाला घातला. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने आळंदीसह संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

सहल ठरली काळरात्र…

मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जण समुद्रात उतरले. मात्र काही क्षणांत परिस्थिती बदलली आणि आठ विद्यार्थ्यांना समुद्राने आपल्या कवेत घेतले. घटनेनंतर बचावकार्य करण्यात आले; परंतु आठही विद्यार्थ्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

ज्या मुलांना हसत-खेळत सहलीसाठी निरोप दिला, त्यांचे मृतदेह पाहण्याची वेळ पालकांवर आली, ही कल्पनाही मन सुन्न करणारी आहे. दुर्घटनेची माहिती आळंदीत पोहोचताच विद्यार्थी, पालक आणि नातेवाईकांमध्ये प्रचंड दुःखाचे वातावरण निर्माण झाले. अनेक कुटुंबांचा आधार क्षणात हिरावला गेला.

आठ उमलत्या जीवांचा अंत… जबाबदारी कोणाची?

ही घटना केवळ एक दुर्दैवी अपघात म्हणून बाजूला ठेवता येणार नाही. विद्यार्थ्यांना समुद्रकिनारी नेण्यापूर्वी त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती व्यवस्था करण्यात आली होती, समुद्रातील संभाव्य धोके आणि स्थानिक सूचना याबाबत माहिती घेण्यात आली होती का, विद्यार्थ्यांवर पुरेशी देखरेख होती का, याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

हिंदजागरचे थेट प्रश्न

१) इतक्या विद्यार्थ्यांची सहल समुद्रकिनारी नेली जात असताना त्यांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी नेमकी कोणती पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक व्यवस्था करण्यात आली होती?

२) सहलीचे आयोजन करताना आवश्यक परवानग्या, जबाबदार व्यक्तींची नियुक्ती, स्थानिक प्रशासनाच्या सूचना आणि समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन झाले होते का?

या प्रश्नांची उत्तरे अधिकृत तपासातून समोर येणे आवश्यक आहे. दोष निश्चित करण्याआधी वस्तुस्थिती आणि पुरावे तपासणे महत्त्वाचे आहे; मात्र आठ विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जबाबदारी निश्चित करून ठोस सुरक्षा नियमांची अंमलबजावणी होणे तितकेच गरजेचे आहे.

आळंदीवर शोककळा… पालकांचा आक्रोश

एका सहलीने आठ कुटुंबांचे आयुष्य कायमचे बदलून टाकले. कालपर्यंत घरात हसणारी, भविष्याची स्वप्ने पाहणारी मुले आज आपल्यात नाहीत. या आठही विद्यार्थ्यांच्या अकाली निधनाने आळंदी शहरावर शोककळा पसरली आहे.

दिवेआगर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टलकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे असीम दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

बातमीदार – गणेश मारुती जोशी

TAGGED:
Share This Article
Follow:
Welcome to Hindjagar News — हिंदजागर आणि आसपासच्या परिसरातील ताज्या बातम्या, अद्यतने आणि घडामोडींसाठी तुमचे विश्वसनीय माध्यम. आमचे ध्येय वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अचूक, वेळेवर आणि सहज समजण्याजोग्या बातम्या पुरवणे हे आहे. आम्ही स्थानिक कार्यक्रम, समुदायविषयक घडामोडी, शिक्षण, व्यवसाय, सरकारी कामकाज, सामाजिक मुद्दे, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्त्वपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करतो.
Leave a Comment