HindJagar News – Pune – शिरूर तालुक्यातील संकेत महामुनी टोळीच्या तिघांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यासह पुणे शहर,पिंपरी चिंचवड शहर आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व पारनेर येथून तडीपार केले आहे.अभिषेक हनुमान मिसाळ (वय-२३वर्षे,रा.सोनारअळी, शिरूर, जि.पुणे) व शुभम दत्तात्रय दळवी (वय-२८वर्षे, रा.प्रीतम-प्रकाश नगर, शिरूर, जि.पुणे) आणि गणेश उर्फ श्रीरंग शंकर महाजन (वय-३०वर्षे, रा.गोलेगाव, ता.शिरूर, जि.पुणे) या तीनही रेकॉर्डवरील आरोपींना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून तडीपार केले आहे.
तडीपार केलेले आरोपी हे रांजणगाव गणपती,करडे-सरदवाडी ‘एमआयडीसी’ येथे दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार असून, संकेत महामुनी टोळीचे सदस्य आहेत. तसेच बेकायदा घातक हत्यारे व गावठी पिस्तूल सोबत बाळगून पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत पसरविणे आणि विविध गुन्हे करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे आरोप महामुनी टोळीतील तडीपार केलेल्या आरोपींवर आहेत.
संबंधित तीनही आरोपींना २-एप्रिल-२०२५ पासून पुढील दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले असून, शिरूर शहरासह ग्रामीण भागात व तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये येथून पुढेही दहशत व गुंडगिरी पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसेच गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करून कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.
— Ganesh Maruti Joshi..