HindJagar News – Pune – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थिनींसमोर अश्लिल कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.तीन विद्यार्थिनी जेवण करून रिफॅक्टरीकडून मुलींच्या वसतीगृहाकडे जात होत्या, तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्याकडे पाहून अश्लिल कृत्य केले. हा प्रकार मराठी भाषा विभागाच्या बाहेर घडला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देऊनही विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर आंदोलन केलं.
पीडित विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्या जेवून रिफॅक्टरीतून बाहेर पडल्या, तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे पाहून अश्लिल कृत्य केलं, त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींपैकी एक सुरक्षा रक्षकाला बोलावण्यासाठी धावली, तर इतर दोघींनी त्या व्यक्तीला जाब विचारला, पण तेवढ्यात तो तिथून पळून गेला. घडलेल्या घटनेबद्दल विद्यार्थिनींनी मित्र-मैत्रिणींना माहिती दिली, यानंतर त्यांनीही आरोपीला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही.
विद्यार्थिनींनी याबाबत विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ.ज्योती भाकरे यांच्याकडे तक्रार केली, पण हा विषय माझ्या अखत्यारीत नाही, असं सांगून त्यांनी विद्यार्थिनींना कुलगुरूंना भेटण्याचा सल्ला दिला. यानंतर विद्यार्थिनींनी कुलगुरूंसोबतही संवाद साधला, पण प्रतिसाद मिळाला नाही. उलट रात्री 9 वाजता मुली तिथे काय करत होत्या? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला आहे.
विद्यापीठ प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आंदोलन केलं आहे. विद्यापीठ प्रशासन अधिकृतरित्या कारवाई करत नाही तोपर्यंत तासिकेला न जाण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
—- गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )