HindJagar News – Pune – वडगाव शेरी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या तरी, पाण्याची समस्या अद्याप सुटली नाही.त्यामुळे सोमनाथनगर परिसरातील महिला आणि नागरिकांनी पाण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.
वडगाव शेरी परिसरातील धनलक्ष्मी सोसायटी, ग्रेवाल सोसायटी, सुनीतानगर, सोमनाथनगरचा परिसर या भागात गेल्या दोन महिन्यांपासून अपुर्या, कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत तक्रार केली होती.
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी या भागाला अनेक वेळ्या भेटी दिल्या. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासनही दिले. मात्र, तरी ही समस्या अद्याप सुटली नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ. उषा कळमकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पाण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आणि मोठी जलवाहिनी टाकली जात नाही, तोपर्यंत या भागातील नागरिक आणि महिला धरणे आंदोलन करणार आहेत.
दोन महिन्यात पाणीपुरवठा सुरळीत करू, तोपर्यंत टँकर देऊ, असे आश्वासन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी महिलांना दिले. मात्र असे आश्वासन मागील दोन महिन्यांपासून मिळत असल्यामुळे आता आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही असे महिलांनी यावेळीअधिकाऱ्यांना सुनावले.
कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर म्हणाले, या भागात पाणीटंचाईची कारणे आम्ही शोधत आहोत. पाण्याच्या टाकीमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे. शिवाय या भागातील जलवाहिन्या 30 वर्ष जुन्या आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत.
पाण्यासाठी दोन महिने आम्ही दारोदार फिरत आहोत. आम्हाला आश्वासन नको, पाणी द्या. आम्हाला पुरेसे पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत.– सौ.सुरेखा संदीप निकम ( साळुंखे ) (स्थानिक रहिवासी व माजी नगरसेविका, म.न.पा पुणे )
—- गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )