हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – मोदी-शहांना पुण्यातले वर्चस्व टिकवायचे. म्हणजे लाखांच्या मतांनी पुण्याचा खासदार निवडून आणायचाच आहे. पण ठाकरे-पवारांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे तगडे आव्हान डोकेदुखी ठरू शकते.या आघाडीचा उमेदवार कोण ? हे कुणालाच ठाऊक नाही. तर, भाजपमध्ये मोदींपासून अर्धा डझन नेत्यांची नावे पुढे येत आहेत. अशातत भाजपला (BJP) अधूनमधून टाळी देणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेकडून माजी नगरसेवक वसंत मोरेंनी तर; चक्क प्रचाराला प्रारंभ केला आहे.गल्लीबोळात फिरणाऱ्या रिक्षांवर छोटे-छोटे बॅनर लावून वसंततात्या कामाला लागले आहेत. याच तात्यांचा वाढदिवस मंगळवारी जोरात झाला आणि अनेकांनी खासदार व्हा, अशा शुभेच्छाही त्यांना दिल्या. त्यात, भाजपच्या काही नेत्यांनीही तात्यांना शुभेच्छा दिल्या. तात्यांच्या ‘वर्किंग स्टाइल’वर खूष असलेल्या भाजप खासदार उदयनराजेंनीही बुधवारी त्यांना शुभेच्छा दिल्या.
‘वसंतराव तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण व्हावी अन् ती होईलही, असे सांगायला उदयनराजे विसरले नाहीत. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्याची जबाबदारी देताच निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केलेल्या तात्यांच्या मनात आता दिल्लीच (लोकसभा जिंकण्याची इच्छा) आहे. तेव्हा तात्यांची खासदारकीची इच्छा हेरूनच उदयराजेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या असाव्यात, हे नाकारता येणार नाही. मात्र, भाजपच्या खासदाराकडून अडून का होईना, पण राजकीय झेप घेण्याची अपेक्षा व्यक्त झाल्याने चर्चेला तोंड फुटले आहे. त्यामुळे उदयनराजेंनी तात्यांना वाढदिवसाचे निमित्त करून केलेला फोन आणि त्यांच्यातील चर्चेने राजकीय वर्तुळात धुरळा उडवणार, हे नक्की.दरम्यान, मनसे (MNS) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वबळावर तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेच्या वतीने मोरे यांच्यावर लोकसभेच्या दृष्टीने संघटक म्हणून जबाबदारी दिली आहे. या नियुक्तीनंतर मोरे यांनी पक्ष बांधणीसाठी दौरे सुरू केले आहेत. त्यांनी पुण्यातून खासदार होण्याबाबत मोठे विधान केले होते. पक्षाने संधी दिली तर महाराष्ट्रातला मनसेचा पहिला खासदार वसंत मोरे असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.त्यानंतर वसंत मोरे (Vasant More) यांचे संपूर्ण पुणे शहरात भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते, त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. तो फोनकॉल सोशल मीडियावर शेअर करत मोरे म्हणाले, जेव्हा महाराज साहेब वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतात… त्यावर अनेक कार्यकर्त्यांनी खासदारांकडून भावी खासदारांना शुभेच्छा असे म्हटले आहे. त्याची जोरदार चर्चा होत आहे.
=== श्री.गणेश मारुती जोशी (प्रतिनिधी )