हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – नृत्यांगना गौतमी पाटील ही वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे. तिच्या लावणी कार्यक्रमांमध्ये नेहमीच गोंधळ होतो. पोलिसांना लाठीमार करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सोलापुरात तिच्या लावणी कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात अथवा गावात गौतमीचा कार्यक्रम असतो तिथे कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद होत असल्याचे दिसून आले आहे.काही दिवसांपूर्वी कोल्हापूरात गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमाच्या आयोजनावरुन वाद झाला होता. त्यानंतर आता सोलापूरात देखील वादाला सुरुवात झाली आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवच्या काळात देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास राज्यात काही ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली होती. गौतमी ही सोलापुरातील एका डिस्को दांडियाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार होती. त्या कार्यक्रमालाच पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं प्रेक्षक आणि चाहते यांचा हिरमोड झाला आहे. सोलापूरातील विजापूरनाका पोलिसांनी ही भूमिका घेतल्याची माहिती आहे.गेल्या काही दिवसांता कोल्हापूर, सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमाला विरोध झाला होता. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातही तोच प्रकार दिसून आला आहे. सोलापूर पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. गौतमीच्या कार्यक्रमाच्या वेळी होणारी हुल्लडबाजी, गोंधळ यामुळे पोलिसांवर येणारा ताण हे यामागील कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठी मनोरंजन विश्वामध्ये सध्या आघाडीची सेलिब्रेटी म्हणून गौतमीकडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून गौतमीने तिच्या नावाची वेगळी ओळख मनोरंजन क्षेत्रात तयार केली आहे. ती जितक्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे तेवढीच तिच्या भोवतीचा वादही चर्चेत आला आहे.नवरात्रीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा देणे शक्य नसल्याने पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. याशिवाय सोलापुरात गौतमी येणार की नाही?, याबद्दलही अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.
== विनोद वाघमारे ( स्थानिक प्रतिनिधी )