हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसच्या डब्यांना अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना आज (सोमवारी) दुपारी खंडाळा घाटात घडली असून पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलात प्रशिक्षणार्थी फायरमन म्हणून कार्यरत असलेल्या तीन जवानांनी रेल्वे प्रवासात प्रसंगावधानता दाखवत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.या रेल्वेला लागलेली आग तात्काळ आटोक्यात आणून जवानांनी कर्तव्यनिष्ठा दाखवली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळालीय. मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसनं पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलात प्रशिक्षणार्थी फायरमन म्हणून काम करणारे भूपेश पाटील, नितीन ससाणे आणि विजय पाटील प्रवास करीत होते. रेल्वे खंडाळा घाटातील पळसदरी येथे आल्यानंतर अचानक रेल्वेच्या चाकातून धूर निघत असल्याचं दिसून आलं. त्याचवेळी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना लायनर गरम झाल्याने ठिणग्या उडू लागल्याचं लक्षात आलं. तसेच धूर पसरत आग लागली होती.
दरम्यान, अचानक धूर येऊ लागल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेमुळे रेल्वेचं इंजिन जाम होण्याचा धोका होता. इंजिन जाम झालं असतं तर पुणे-मुंबई लोहमार्गावरील रेल्वेसेवा काही काळ ठप्प झाली असती. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत मोठी दुर्घटना रोखली. याबद्दल या तिन्ही जवानांचं कौतुक केलं जातय.
— विनोद दत्तात्रय वाघमारे ( हिंदजागर न्यूज,पुणे )