हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – शहरातील सर्वाधिक वर्दळ आणि दिवसभर वाहतूक कोंडीत सापडलेला नगररस्ता आता सुसाट होणार आहे. महापालिकेच्या पथ विभागाने पर्णकुटी चौक ते आपलं घर या भागात तब्बल साडेसात किलोमीटरच्या रस्त्यावर सोमवारी अनधिकृत बांधकाम तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारी बांधकामे हटवली.रस्त्यावरील गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, रामवाडी चौक, विमाननगर चौक, सोमनाथनगर चौक, खराडी बायपास तसेच आपले घर चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस तब्बल ही कारवाई करण्यात आली आहे. परिणामी, काही चौकातील वाहतूक कोंडी लक्षणीय कमी होणार आहे. त्यात बायपास चौक, शास्त्रीनगर चौक या दोन मुख्य चौकांचा समावेश आहे.महापालिकेने 2008 मध्ये “जेएनएनयूआरएम’अंतर्गत या रस्त्याचे रुंदीकरण तसेच कॉंक्रीटीकरण केलेले असून, हा रस्ता महापालिकेच्या विकास आराखड्यात 60 मीटर रुंद आहे. प्रत्यक्षात शास्त्रीनगर चौक तसेच खराडी बायपास चौक आणि गुंजन चौकात व्यावसायिकांनी अतिक्रमणे केले आहे. त्यामुळे येथे येणारी वाहने रस्त्यावरच थांबतात. शिवाय, बीआरटीमुळे येथील रस्ता आधीच अरुंद झाला होता. त्यामुळे बांधलेले शेड, बांधकामे, पार्किंगसाठी बोर्ड लावून अडवलेली जागा रिकामी करण्यात आली.
” 15 आदर्श रस्त्यांमध्ये नगर रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत कोंडीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यात आली. काही भागात रस्ते तसेच चौकांची फेररचना केली जाणार आहे. प्रामुख्याने बायपास चौकात या कारवाईमुळे नगररस्त्याकडे जाण्यासाठी दोन लेन उपलब्ध होणार आहेत. तर नगर रस्त्याकडून आलेल्या वाहनांना थेट हडपसरकडे वळता येणार आहे. परिणामी, कोंडी कमी होण्यास मदत होईल. शास्त्रीनगर चौक तसेच विमाननगर चौकातही असे बदल केले जाणार आहेत.”- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मनपा
दरम्यान, पालिका प्रशासनाने आधी रस्त्याचे सर्वेक्षण करून एकाच वेळी 6 जेसीबी, 6 गॅसकटर, तब्बल 100 बिगारी, 20 पोलीस कर्मचारी, 35 महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी, 24 सहायक अतिक्रमण निरीक्षक यांच्या पथकाने तब्बल 30 हजार चौरसफूट बांधकाम काढले. यात तब्बल 50 शेड, 15 पथाऱ्या, 5 हातगाड्या, 6 स्टॉल काढण्यात आले.
— प्रदीप कांबळे ( हिंदजागर न्यूज,पुणे )