हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – न्यूझीलंडचा संघ ‘डेंजर’ का आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली. भारताने ठेवलेल्या ३९८ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना दोन्ही सलामीवीर ३९ धावांवर माघारी परतूनही किवींकडून कडवी टक्कर मिळाली.केन विलियम्सन आणि डॅरिल मिचेल यांनी भारतीय चाहत्यांना गॅसवर ठेवले होते. २०१९च्या कटू आठवणी हळुहळू डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या… मोहम्मद शमीने दोन वेळा भारताला सामन्यात पकड मिळवून दिलेली, परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला साथ मिळत नव्हती.. भारतीय खेळाडू निराश अन् चाहते हताश झालेले दिसले. अखेर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परतला तो शमीने घेतलेल्या सातव्या विकेटने. कुलदीप यादवच्या शेवटच्या टप्प्यातील दोन षटकाने खऱ्या अर्थाने मॅच फिरवली.
मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना ३९ धावांवर माघारी पाठवून भारताला चांगली सुरुवात करून दिली. डेवॉन कॉनवे ( १३) आणि रचिन रवींद्र ( १३) हे स्वस्तात माघारी परतले. पण, केन विलियम्सन आणि डॅरिल मिचेल यांच्या १८१ धावांच्या भागीदारीमुळे वानखेडे स्टेडियमवर शांतता पसरली होती. त्यात भारतीय खेळाडूंकडून झेल सुटले, रन आऊटची संधी गमावली गेली अन् पायचीतचा निर्णय विरोधात गेला.. त्यामुळे तणाव वाढत चालले होते. मिचेल उत्तुंग फटके मारत होता, तर केनने कौशल्यपूर्ण खेळी करून चौकार मिळवले होते. मिचेलने ८५ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत शतक झळकावणारा तो किवींचा तिसरा फलंदाज ठरला.
न्यूझीलंडला ३६ चेंडूंत ९९ धावा करायच्या होत्या. शमीने आजच्या सामन्यातील पाचवी विकेट घेताना मिचेलला बाद केले. मिचेलने ११९ चेंडूंत ९ चौकार व ७ षटकारांसह १३४ धावा केल्या. वर्ल्ड कप मधील चौथ्यांदा शमीने डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि उपांत्य फेरीत पाच विकेट घेणारा तो पहिला भारतीय ठरला. शिवाय सर्वाधिक ४ वेळा ५ विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही त्याने नावावर नोंदवला. सिराजला अखेर ४८व्या षटकात विकेट मिळाली. शमीने ५७ धावांत ७ विकेट्स घेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४८.५ षटकांत ३२७ धावांत तंबूत पाठवला. भारताने ७० धावांनी हा सामना जिंकला. २०११ नंतर भारतीय संघ वर्ल्ड कप फायनल खेळणार आहे.
— प्रदीप कांबळे ( हिंदजागर न्यूज