हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – शरद पवारांचे ओबीसी सर्टिफिकेट दाखविणाऱ्या नामदेव जाधव यांच्यावर पुण्यात शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यांच्या तोंडाला काळे फासले. शरद पवारांवर नेहमी टीका करतात म्हणून नामदेव जाधव यांना धडा शिकवला, असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नंतर केला.
पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी नामदेव जाधव यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.नामदेव जाधव आपल्या दाव्यावर ठाम राहिले. पवार हे मराठा नेतेच नाहीत. त्यांनी केली 50 वर्षे मराठा नेता म्हणून राजकारण केले आणि 5 कोटी मराठ्यांना फसविले, असा आरोप जाधव यांनी गेले काही दिवस सातत्याने सुरू ठेवला होता. या आरोपावर चिडून जाऊन पुण्यात शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांच्यावर आणि त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले.
नामदेव जाधव हे पुणे श्रमिक पत्रकार संघासमोर पत्रकारांची बोलत असताना राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी नामदेव जाधव यांच्या विरोधात आणि शरद पवारांच्या बाजूने घोषणा देत जाधव यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या तोंडाला काळे फासले.नामदेव जाधव यांनी या संदर्भात संताप व्यक्त करून आपल्यावरील हल्ल्यासाठी शरद पवार आणि रोहित पवार यांना जबाबदार धरले. शरद पवारांची खासदारकी आणि रोहित पवारांचे आमदारकी रद्द करण्यासाठी आपण मोठे पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी नंतर फेसबुक लाईव्ह करून सांगितले. पवारांचे ओबीसी सर्टिफिकेट मी दाखविले. परंतु कागदाला कागदाने उत्तर देता येत नाही म्हणून त्यांच्या चिथावणीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, असा आरोप त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये केला.
— गणेश मारुती जोशी (हिंदजागर न्यूज, पुणे )