हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – आयटी नगरी हिंजवडी परिसरात होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी, सांगवीच्या एका आयटी अभियंत्यानं एक भन्नाट जुगाड शोधून काढलं आहे. हिंजवडी परिसरात सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होत आहे.याचा मोठा फटका हा आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसू लागला आहे, त्यामुळे काही कर्मचारी हे वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडत आहेत, तर काही कर्मचारी आपल्या कामाच्या वेळेअगोदरच कंपनीत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र याला अपवाद ठरलाय तो सांगवी परिसरात राहणारा आर्यकुमार हा आयटी इंजिनीअर वाढती वाहतूक कोंडी, पेट्रोलचे गगनाला भिडलेले भाव आणि त्यातच वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण यावर उपाय म्हणून, आर्य कुमारने आपल्या इलेक्ट्रिक सायकलवर प्रवास करत ऑफिस गाठण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा हा निर्णय खरोखरच योग्य असल्याचं आता बोललं जात आहे. आर्य कुमार दररोज सांगवी ते हिंजवडी असा दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास या इलेक्ट्रिक सायकलवरून करतोय , आर्यनची ही सायकल केवळ 35 हजार रुपयांची असून तिला महिन्याला केवळ 20 रुपये इतकाच विजेचा खर्च येतो. या सायकलचा वेग ताशी 30 किलोमीटर इतका असून, वजनाने हलकी असलेले ही सायकल फोल्ड करून कोठेही घेऊन जाता येते. त्यामुळे आर्य कुमार हा वेळेत आपल्या ऑफिसलाही पोहोचू लागला आहे .
आर्य कुमार सारख्या जुगाडू आयटी इंजिनिअरचं कौतुक आता सर्व स्तरातून होऊ लागलं आहे. त्यामुळे इतरही आयटी अभियंते अशाच प्रकारच्या अद्ययावत साधनांचा वापर करून आपल्या कामाला प्रोत्साहन देतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.