हिंदजागर न्यूज पुणे – काश्मीर सहलीसाठी पर्यटकांकडून ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पर्यटन कंपनीच्या संचालकाविरुद्ध चतु:शृंगी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याने पैसे घेतल्यानंतर ठरल्याप्रमाणे विमानाची तिकिटे, तसेच पर्यटनाचे नियोजन न करता फसवणूक केली आहे.याप्रकरणी पॅरेडाईज हाॅलिडे टूर्सचे संचालक रवींद्र बाबाजी शेंडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिषेक माणिकराव ननावरे (३७, रा. कृष्णकुंज सोसायटी, गुलटेकडी) यांनी चतु:शृंगी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पॅरेडाईज टूर्सचे कार्यालय ओैंधमधील ब्रेमेन चौक परिसरातील एका इमारतीत आहे. शेंडकरने जम्मू- काश्मीर सहलीचे आयोजन केले होते.
सहलीसाठी ननावरे यांनी शेंडकर याच्याकडे ७० हजार रुपये जमा केले होते, तसेच राधेय दगडे यांच्याकडून दोन लाख ४० हजार रुपये आणि संतोष राऊत यांच्याकडून सात लाख ९० हजार ९२७ रुपये घेतले होते. शेंडकरने तिघांकडून ११ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर सहलीचे आयाेजन न करता फसवणूक केल्याप्रकरणी शेंडकरविरुद्ध तक्रार देण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करत आहेत.