हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – पुण्यातील पौर्षे अपघात प्रकरण ताजं असतानाच आणखी अपघातांच्या घटना घडत असल्याचं समोर येतंय. एकामागोमाग पुण्यात बरेच अपघातांच्या घटना घडल्याचं चित्र आहे. आता पुण्यातून आणखी एक अपघात झाल्याची घटना समोर आलीय.मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना घडली आहे.पुण्यातील येरवड्याच्या गोल्फ क्लब चौकात हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. एक मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला धडक दिली असून या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओही व्हायरल होत आहे.
येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात आलिशान मर्सिडीज बेंज गाडीखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मर्सिडीज बेंजच्या चालकाला ताब्यात घेण्यात आली असून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
केदार मोहन चव्हाण (वय 41) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर मर्सिडीज बेंजचा चालक नंदू अर्जुन ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात देण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे दुचाकीनी जात होते. यावेळी दुचाकी स्लिप झाल्याने केदार चव्हाण रस्त्यावर कोसळले. याचवेळी पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज गाडी त्यांच्या अंगावर गेली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजतात येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी कारचालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.