हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर पुण्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून कारवाईला वेग आला आहे. पुण्यात दारु पिऊन गाडी चालवल्यास परवाना रद्द करण्यात येणार असल्याचंही पुणे पोलिसांनी यापूर्वीच सांगितलं आहे.
मात्र, अद्यापही बड्य बापांची लेकरं दारु पिऊन गाडी चालवून इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी पोर्शे कार अपघात, त्यानंतर अपघातांची मालिकाच लागल्यांचं दिसून आलं. मुंबईतील वरळीतही हीट अँड रन प्रकरण चांगलंच गाजलं. आता, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या लेकानं दारु पिऊन टेम्पोला धडक दिली. त्यामध्ये, टेम्पोचालक आणि गाडीचा क्लीनर जखमी झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने दारू पिऊन अपघात केलाय. ड्रंक एन्ड ड्राईव्हच्या या घटनेत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सौरभ गायकवाड हा देखील जखमी झालाय. पुण्यातील मांजरी-मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर येथे मंगळवारी 16 जुलै रोजी पहाटे हा अपघात घडलाय. सौरभ गायकवाड हा त्याची MH 12 TH 0505 क्रमांकाची हॅरीयर कार घेऊन पहाटे पाच वाजता मुंढव्यातील घरी निघाला होता. त्यावेळी तो दारुच्या नशेत होता. त्यामुळे समोरुन येणाऱ्या पोल्ट्री फार्मच्या टेम्पोला त्याने धडक दिली. त्यावेळी, तिथे जमलेल्या लोकांनी चालक व क्लीनर राजा शेख याला वरद लाइफ हॉस्पिटल येथे घेऊन उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी, चालकाच्या कपाळावर जखम झाली असून खांद्याला मुका मार लागला होता. तर क्लीनर राजा शेख याला उजव्या चेहऱ्यावर खर्चटलेले असून उजव्या पायाच्या नडगीला जखम झाली होती, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, याप्रकरणी सौरभ गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ गायकवाडचे वडील बंडू गायकवाड हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत आहेत.
पुण्यतील गुन्हेगारी घटनांवरुन नेतेमंडळींचा संताप…
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून पुणे शहरातील अपघात, ड्रग्ज प्रकरण, वाहतूक कोंडी आणि वाढती गुन्हेगारी चांगलीच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्याच्या वाढत्या गुन्हेगारीवर आणि बदलत्या परिस्थितीवर भाष्य करताना, पुणे ही क्राइम कॅपिटल बनत असल्याचं म्हटलं होतं. तर, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनीही ड्रग्ज प्रकरणावरुन आक्रमक भूमिका घेत थेट राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पुणे पोलिस आयुक्तांवर हफ्तेखोरी व भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.
Repoter – विनोद वाघमारे.