हिंदजागर न्यूज प्रतिनिधी- पुणे- पुण्यात गेल्या २४ तासात अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. पुणे शहरात पावसाने हाहाकार उडालाय. रहिवाशी इमारतींमध्ये पाणी शिरल्याने लोक अडकले आहेत.तर काही ठिकाणी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झालीय. ताम्हिणी घाटात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला तर पुलाचीवाडी इथं शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. आता वारजे इथं एकाच गोठ्यातील १५ जनावरं मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे.
वारजे इथं एका गोठ्यात पुराचं पाणी शिरल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. गोठ्यात दावणीला बांधलेल्या १५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. गोठ्यात जनावरं बांधलेली असल्यानं पाणी शिरल्यानंतर ती वाचू शकली नाहीत. जागेवरच मुक्या जीवांचा तडफडून मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे.
खडकवासलाचा विसर्ग रात्री वाढवल्याने पूर
खडकवासला धरणातील विसर्ग राञी थेट 35 हजार क्यूसेक पर्यंत वाढवल्याने मुठा नदीला मोठा पूर आला होता. पण आता खडकवासला धरणातला विसर्ग 15 हजारांपर्यंत कमी करण्यात आलाय. त्यामुळे मुठा नदी पुराचं पाणीही आता काही प्रमाणात ओसरल्याचं बघायला मिळतंय. दरम्यान, पुणे मनपासमोरचा गाडगीळ पूल हा 10 वर्षांनंतर आज पहाटे पहिल्यादाच पुराच्या पाण्याखाली गेला होता. आता तिथलंही पाणी ओसरलं असलं तरी पाटील इस्टेट, पुलाची वाडी या नदी काठच्या वस्त्यामधॆ अजूनही काही ठिकाणी पुराचं पाणी दिसतंय.
Repoter – गणेश मारुती जोशी