हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर कोणाचं आहे, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.यामध्ये 4 प्रवासी होते, अशी माहिती घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे, तर अद्याप त्या प्रवाशांबाबतची माहिती समजू शकलेली नाही.
ही दुर्घटना अत्यंत भीषण आहे. पौड जवळच असलेल्या घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. खराब हवामान आणि पाऊस यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट सोबतच 4 जण असल्याची माहिती आहे, ते यामध्ये जखमी झाले आहेत. या घटनेचं वृत्त समजताच परिसरात मोठी गर्दी झाली आहे. त्यातील २ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचते आहे, पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले आहेत, या घटनेनंतर घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली, दरम्यान ही दुर्घटना कशी घडली यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, पावसामुळे आणि खराब हवामानामुळे घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तर या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का यांचा तपास करण्यात येईल.
घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिली माहिती
हेलिकॉप्टर काही वेळ घोटावड्याच्या दिशेने आकाशात घिरट्या घालत होतं. अचानक ते खाली पडल्याचा मोठा आवाज आला. त्यामध्ये चार जण होते, 2 जण गंभीर जखमी आहेत. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक आणि आजुबाजूचे लोक मदतीसाठी आले आहे, पायलट बोलण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात नेलं जाईल. त्या ठिकाणी 200-300 ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोसळलेल्या हेलिकॉप्टरच्या आजूबाजुला न जाण्याचं आवाहन पायलटनी नागरिकांना केलं आहे. कारण या हेलिकॉप्टरचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.