हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे- दिवाळीत फटाके फोडावेत असा गोळीबार करत वनराज आंदेकर यांचा रविवारी रात्री टोळक्याने नाना पेठेत खून केला. या घटनेनंतर काही तासातच हडपसर येथे मोबाईलचे व्हॉटस्पॉट दिले नाही म्हणून एका निरपराध व्यक्तीचे डोकेच चौघांनी कोयत्याने छिन्नविच्छिन्न केले.मागील आठवड्यात सराईत गुंडानी पोलिस अधिकार्यावर कोयत्याने वार केले. त्यापूर्वी सिंहगड रोड परिसरात तडीपार गुंडाचा डोक्यात हातोडा घालून खून करण्यात आला. या घटना पाहात पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असाच सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील टोळीप्रमुख आणि त्यांच्या पंटरांची आयुक्तालयात परेड घेतली. त्यांना पोलिसी भाषेत दम भरून शिस्तीचे धडे दिले. मात्र काही कालावधीतच पोलिसी खाक्याला न जुमानता गुन्हेगारांनी आपले काम चोख बजावण्यास सुरुवात केली. वाहनांची तोडफोड, कोयत्याचे वार अन् बंदुकीचे बार सुरू झाले.
वानवडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर सराईत गुंडानी कोयत्याने वार केला. पोलिसांवरच गुन्हेगार वार करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा सवाल उपस्थित होतोय.
वनराज आंदेकरांच्या खुनामुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांतील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा पुढे आला आहे. गोळीबार करून कोयत्याने वार करत वनराज यांचा खून करण्यात आला. त्यामुळे गुन्हेगारांची विकृती कोणत्या थराला गेली असल्याचे दिसून येते. नाना पेठेत वनराज यांच्या नावाचे वलय मोठे, ते जरी गुन्हेगारी विश्वात सक्रिय नसले तरी, आंदेकर टोळीचा मोठा दबदबा, असे असतानाही त्यांचा टोळक्याने खून केला.
गेल्या काही दिवसांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या आणि विनयभंगांच्या घटना
पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या, शाळकरी मुलींच्या विनयभंगाच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागल्या आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलींना रिक्षावाले, स्कून व्हॅन चालक, शिक्षक यांच्याकडून विनयभंगाची, अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे.
“शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात मागच्या काही दिवसात घडलेल्या घटना कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या आहेत. यातून पुणे शहराची ओळख क्राइम कॅपिटल अशी होत चालली आहे. खून, दरोडे, बलात्कार, चोऱ्या, अवैध धंदे व अमली पदार्थ या दररोजच्या बातम्या बघून सुसंस्कृत पुण्याची देशभरात बदनामी होत असल्याचे जगजाहीर आहे. शहरात टोळी युद्धाचा देखील भडका उडालाय, कोयता गँगच्या दहशतीने पुणेकर भयभीत आहेत. गृहमंत्र्यांनी या घटना गांभीर्याने घ्याव्यात आणि कठोर पावले उचलावीत”
आता पुन्हा तोच सवाल आहे की, वनराजच्या मृत्यूनं पुण्यातलं हे टोळीयुद्ध संपलंय की सुरु झालंय. एकूणच पोलिसांच्या आणि गृहविभागाच्या समोर हे टोळीयुद्ध रोखणं मोठं आव्हान असणार आहे.
— गणेश मारुती जोशी.