हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे –राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अशातच पुणे भाजपातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. भाजप शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हापासून आपण निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तेव्हापासून आपल्याला बहिष्कृत करण्यात आल्याचा आरोप अमोल बालवडकर यांनी केला आहे. जाहीर सभेतच त्यांनी असा आरोप केल्याने भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
बालवडकर म्हणाले, ” दोन महिन्यांपूर्वी ज्यावेळी मी स्थानिक नेत्यांकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी माझ्या डोक्यावरचा हात काढून घेतला. मला बहिष्कृतासारखी वागणूक दिली. मला पक्षाच्या कार्यक्रमांना बोलवण्याचे टाळलं गेलं. माझ्याही कार्यक्रमांना कोणीही आले नाही. यामुळे मला खूप वेदनाही झाल्या. गेल्या 10 वर्षांपासून आपण काम करत आहोत. त्याच्या तन,मन, धनाने काम करत आहे. त्याची इच्छा आणि कार्यक्षमता असताना निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहे. त्यांनी मोठ मन दाखवायला पाहिजे होतं. पण आता जनताच माझ्या पाठिशी आहे.
मी माझ्या पक्षाला हात जोडून विनंती केली होती. कुठल्याही मोठ्या नेत्याचा माझ्यावर हात नाही. मी तळागाळातून आलो आहे. मी या नागरिकांच्या सुखदुखात सहभागी झालो. त्यांनी माझा विचार करायला हवा होता. माझ्या पिढ्यान पिढ्या समाजसेवा केली आहे. त्यामुळे त्यांनी माझा विचार करावा, पण तुम्ही माझा विचार नाही केला तर जी मायबाप जनताच माझे भविष्य ठरवेल, असा सूचक इशाराही अमोल बालवडकर यांनी केला आहे.
इतकेच नव्हे तर, कोथरूड मतदार संघात आपण लादलेला नाहीतर स्थानिक उमेदवार असल्याने निवडणुकीच्या रिंगणात आपल्या समोर कोण असेल याची परवा न करता, कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणूक लढणार आणि जिंकणार असं सांगत, बालवडकर यांनी कोथरूड मतदार संघातील स्थानिक आणि आयात उमेदवारीचां वाद देखील चव्हाट्यावर आणत पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.
—- गणेश मारुती जोशी.