हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं आज निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टाटा समूहाकडून टाटा यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.
डॉ.शारुख अस्पी गोलवाला यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांचे पथक रतन टाटा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे जाणे भारतीय उद्योगजगतालाच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी दुख:दायक आहे.
सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी रतन टाटा यांची अचानक बिघडल्याची बातमी समोर येत होती. मात्र त्यांनी स्वतः आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याला अफवा असल्याचे म्हटले होते.आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याचे खंडन करताना रतन टाटा स्वतः म्हणाले होते की, ‘माझ्या प्रकृतीबद्दल अलीकडे पसरलेल्या अफवांची मला माहिती मिळाली.मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की हे दावे निराधार आहेत. माझे वय आणि तब्येत यामुळे मी सध्या आवश्यक वैद्यकीय तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मला बरे वाटत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की जनता आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवणे टाळावे, अशी माहिती रतन टाटा यांनी सोशल मीडियावरुन दिली होती.
टाटा उद्योगसमुहाचे माजी प्रमुख रतन नवल टाटा हे भारतातीलच नव्हे तर जगभरात भारताच्या उद्योगजगताचे चेहरे होते. त्यांच्या दातृत्वासाठी ते कायम ओळखले जात. त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण (2008) आणि पद्मभूषण (2000) दोन सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. ते प्रतिष्ठित कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, बिशप कॉटन स्कूल (शिमला), कॉर्नेल विद्यापीठ आणि हार्वर्डचे माजी विद्यार्थी आहेत.
टाटा यांच्या निधनाने आमचं खूप मोठं नुकसान झालंय. माझ्यासाठी ते मित्र मेंटॉर आणि गाईड होते . माझे प्रेरणास्त्रोत होते, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखरन यांनी दिली.
—- अनुराग भालचंद्र साळुंखे .