हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – महाराष्ट्रात विधानसभेचा बिगूल वाजला. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणूक तारखांची घोषणा केली. आता राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये राज्याच्या विधानसभेची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी जाहीर झाली होती. म्हणजेच आता २०२४ मध्ये जवळपास एक महिना उशिराने निवडणूक होत आहे. २०१९ मध्ये राज्य विधानसभेचे मतदान २१ ऑक्टोंबरला मतदान झाले होते. त्यानंतर मतमोजणी आणि निकाल २४ ऑक्टोबर २०१९ रोजी लागले होते. परंतु आता २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. राज्य विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे निकालानंतर सरकार बनवण्यासाठी फक्त तीन दिवस असणार आहे. अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार आहे.
अन्यथा राष्ट्रपती राजवट
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. त्यानंतर निकाल आल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर बहुमत मिळालेल्या युती किंवा आघाडीकडून २४ नोव्हेंबर रोजी बैठक बोलवण्यात येणार आहे. त्यात युती किंवा आघाडीच्या नेतेपदाची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजीच राज्यपालांकडे जाऊन सरकार बनवण्याचा दावा करणार आहे. राज्यपाल २५ नोव्हेंबर रोजी बहुमत असणाऱ्या सरकार बनवण्यासाठी बोलवणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी नवीन सरकारचा शपथविधी समारंभ घ्यावाच लागणार आहे. अन्यथा विधानसभेची मुदत संपत असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे.
२०१९ मध्ये असे घडले
२०१९ मधील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीने एकत्र लढवली होती. परंतु निकालानंतर युती एकत्र राहिली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या सोबतीने शपथ घेतली. परंतु ते सरकार काही तासांचे राहिले. त्यानंतर राज्यातील राजकारणात ट्विस्ट आला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अडीच वर्षानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे ४० आमदारांसह बाहेर पडले. भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वर्षभरापूर्वी अजित पवार महायुतीमध्ये आले.
यंदा २०२४ मध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशी महायुती निवडणूक रिंगणात उतरणार आहे. तसेच महविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असणार आहे. मनसेकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे.
— गणेश मारुती जोशी.