हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील नेत्यांमध्ये आता खडाजंगी दिसून येत आहे. पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी खडाजंगी सुरु असल्याचं चित्र दिसून येत आहे.
आज कोथरुडमधून इच्छुक उमेदवार अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन चंद्रशेखर बावनकुळेंनी भेट घेतली. अमोल बालवडकर कोथरुडमधून बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी बावनकुळे पोहोचले. बाणेरमध्ये त्यांनी अमोल बालवाडकरांची भेट घेतली आहे.
विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना विरोधकांपेक्षा भाजपच्याच अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बालवाडीचे नगरसेवक अमोल बालवाडकरांनी थेट चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. अमोल बालवडकर बंडखोरी करायच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी आता थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या पोहोचले आहेत आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
निवडणुकीत मतांचा फटका बसू नये यासाठी पक्षाला आणि पक्षश्रेष्ठींना बंडखोरी होऊ नये, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. भाजपच्यावतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत आहे. अशातच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी देखील भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु झाल्याच्या चर्चा आहेत. याआधी बालवडकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला होता.
—- गणेश मारुती जोशी .