हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – पुणे शहरातील पुण्यात कसबा, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांची नाव निश्चित झाले असल्याचे म्हटले जात होते. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार या तिन्ही मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे.
धंगेकर पॅटर्नमुळे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लक्षवेधी ठरलेला कसबा यावेळी काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रवींद्र धंगेकरांनाच उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे.
काँग्रेस पक्षातील इतर इच्छुकांकडून मात्र उघड उघड नाराजी व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्ष सामान्य कार्यकर्त्यांना कधी न्याय देणार असा सवाल माजी नगरसेविका संगीता तिवारी यांनी उपस्थित केलाय. तर यावेळी काही झालं तरी निवडणूक लढवणारच अशी भूमिका माजी महापौर कमल व्यवहारे यांनी घेतली आहे. शहर काँग्रेसमधील दोन महिला पदाधिकाऱ्यांनी विरोधी सूर आळवल्यामुळे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
तर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. माजी आमदार रमेश बागवे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर पक्षात नव्याने पक्षात आलेले अविनाश साळवी हे ही कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये काँग्रेस नेमकं कोणाला उमेदवारी देतंय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. उमेदवारीवरून या मतदारसंघामध्ये रस्सीखेच सुरू आहे.
तर काँग्रेसचा तिसरा मतदारसंघ असलेले शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. गेल्या वेळेस निवडणूक लढवणारे दत्तात्रय बहिरट, मनीषा आनंद, दिप्ती चौधरी हे पक्षाकडून तिकीट मिळावी यासाठी इच्छुक आहेत. तर माजी आमदार विनायक निम्हण यांचे पुत्र सनी निम्हण हे देखील काँग्रेसमधून निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे पुण्यातील काँग्रेसच्या तिन्ही जागांवरून वाद होण्याची शक्यता आहे.
—- गणेश मारुती जोशी.