हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | मुंबई – महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.चाळणी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालानंतर आयोगाने हा निर्णय घेतला. औषध निरीक्षक पदासाठी नव्याने फेरपरीक्षा घेतली जाणार असून तिची तारीख आणि सविस्तर वेळापत्रक स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले जाणार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात क्रमांक ११६/२०२५ अंतर्गत २९ जुलै २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती.या भरतीची चाळणी परीक्षा २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवरील परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. परीक्षेचा निकाल १२ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता.
चाळणी परीक्षेच्या निकालानंतर ५०६ उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या.मुलाखती पूर्ण झाल्यानंतर आयोगाने २२ जुलै रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती. या यादीमध्ये ४८५ उमेदवार पदासाठी पात्र, तर तीन उमेदवार अपात्र असल्याचे नमूद करण्यात आले होते.
- कसा फुटला पेपर आणि किती रुपयांत झाला व्यवहार?
मुंबई गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासाचा हवाला देणाऱ्या वृत्तांनुसार, औषध निरीक्षक चाळणी परीक्षेचा समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणारे एमपीएससीचे सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते यांनी तज्ज्ञांकडून तयार करण्यात आलेल्या कथित २९४ प्रश्नांच्या संचाची प्रत अनधिकृतरीत्या मिळवून ती १९ मार्च रोजी आयोगाच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये अवर सचिव अभिजीत लेंडवे यांच्याकडे दिली; लेंडवे यांनी तो संच सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांच्यापर्यंत पोहोचवला आणि २० मार्च रोजी मराठे यांच्याकडून नंदुरबारमधील खासगी अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी तो स्वीकारल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या कथित व्यवहारासाठी प्रवीण पाटीलकडून पाच लाख रुपये देण्यात आल्याचे तपासात समोर आले असून पुढे आणखी पैसे देण्याचे आश्वासनही दिल्याचे वृत्त आहे. त्यानंतर हा प्रश्नसंच नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरात राहणारे अमृत पाटील आणि त्यांची कन्या तथा परीक्षार्थी ऋतुजा पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला; ऋतुजाने प्रश्नसंच मिळाल्याची माहिती तिचा तत्कालीन प्रियकर लोकेश ऊर्फ गौरव पाटील याला व्हॉट्सअॅपवर दिली आणि संबंधित संच त्याच्याबरोबर शेअर केल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. परीक्षेनंतर प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये ऋतुजा सातव्या क्रमांकावर होती. दरम्यान, ऋतुजा आणि गौरव यांच्यातील संबंध संपल्यानंतर गौरवने या कथित पेपरफुटीची माहिती एमपीएससीला देण्याचा निर्णय घेतला आणि परीक्षा विषयक कंटेंट तयार करणारे ऋषिकेश गांगुर्डे यांच्याशी संपर्क साधून आपल्याकडे प्रश्नसंचाची प्रत असल्याचे सांगितले; त्यानंतर गौरवने आयोगाला ई-मेल पाठवला, मात्र तपास जवळ येत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली पूर्वीची माहिती मस्करी किंवा गैरसमजातून दिल्याचा दावा करत माघार घेण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. संबंधित प्रश्नसंचातील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारण्यात आल्याचा दावा असून या संपूर्ण कथित साखळीचा, पाच लाख रुपयांच्या व्यवहाराचा आणि आणखी कोणाला त्याचा लाभ मिळाला का, याचा मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे; त्यामुळे हे सर्व तपशील सध्या तपासातील आरोप असून न्यायालयात दोष सिद्ध होणे बाकी आहे.
परीक्षेपूर्वीच प्रश्न मिळाल्याचा आरोप
भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचलेली असतानाच परीक्षेतील कथित गैरप्रकारांविषयी गंभीर तक्रारी समोर आल्या. २२ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींनी आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रारी दाखल केल्या.तक्रारदारांनी असा आरोप केला की, २२ मार्च रोजी परीक्षा होण्यापूर्वीच, म्हणजे २० मार्च रोजी काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा त्यातील प्रश्न उपलब्ध झाले होते. हे प्रश्न सोशल मीडिया किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रसारित झाल्याचाही दावा करण्यात आला.या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २७ जुलै २०२६ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली.
प्राथमिक चौकशीत काय आढळले?
पोलीस उपआयुक्त, गुन्हे अन्वेषण शाखा यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, एका उमेदवाराला परीक्षेपूर्वी प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा संबंधित उमेदवाराला लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.मात्र, प्रश्नसंच नेमका कोणाकडून बाहेर गेला, तो आणखी किती उमेदवारांपर्यंत पोहोचला आणि या गैरप्रकारामागे संघटित यंत्रणा होती का, याबाबत अंतिम तपासातील संपूर्ण माहिती अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही.
संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय
प्राथमिक चौकशीतील निष्कर्ष गंभीर असल्याने आयोगाने केवळ निकाल किंवा मुलाखत प्रक्रिया रद्द न करता जाहिरात क्रमांक ११६/२०२५ अंतर्गत राबविण्यात आलेली संपूर्ण औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द केली आहे.परीक्षेची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता आणि निष्पक्षता कायम राखणे तसेच उमेदवारांचा आयोगावरील विश्वास अबाधित ठेवणे, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.यामुळे चाळणी परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत दिलेल्या आणि तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनाही आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.
पुन्हा अर्ज किंवा शुल्क भरावे लागणार नाही
आयोगाने उमेदवारांना प्रशासकीय दिलासा दिला आहे. रद्द करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी यापूर्वी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना फेरपरीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही.फेरपरीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची नवीन तारीख, केंद्रे आणि इतर सूचना आयोगाच्या स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकातून जाहीर करण्यात येतील.त्यामुळे उमेदवारांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
प्रामाणिक उमेदवारांना मोठा फटका
संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द झाल्यामुळे अनेक महिने अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या प्रामाणिक उमेदवारांना पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.एका किंवा काही व्यक्तींनी केलेल्या कथित गैरप्रकाराची किंमत शेकडो प्रामाणिक उमेदवारांना का मोजावी लागते, असा संतप्त प्रश्न परीक्षार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र सर्व उमेदवारांना समान आणि निष्पक्ष संधी देण्यासाठी फेरपरीक्षा घेणे आवश्यक असल्याची भूमिका आयोगाने घेतली आहे.
राजकीय वर्तुळातून चौकशीची मागणी
या प्रकरणावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्य सरकार आणि परीक्षा यंत्रणेला लक्ष्य केले आहे. आमदार रोहित पवार यांनी या भरतीतील कथित पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता. एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती.पुण्यात आयोजित कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोरही हा प्रश्न मांडला होता. आता केवळ परीक्षा रद्द करून प्रकरण थांबवू नये; प्रश्नसंच बाहेर काढणाऱ्या आणि त्याची विक्री किंवा प्रसार करणाऱ्या संपूर्ण साखळीचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
उमेदवारांना पारदर्शक तपासाची अपेक्षा
औषध निरीक्षक हे सार्वजनिक आरोग्य आणि औषधांच्या गुणवत्तेशी थेट संबंधित महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदाची भरती पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होणे अत्यावश्यक आहे.
फेरपरीक्षा घेण्याबरोबरच प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेत नेमकी त्रुटी कुठे राहिली, त्यासाठी कोण जबाबदार आहे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी कोणती सुरक्षा व्यवस्था लागू केली जाणार, याची माहितीही आयोगाने सार्वजनिक करावी, अशी उमेदवारांची अपेक्षा आहे.
—– हिंदीजागार ऑनलाईन न्यूज पोर्टल,मुंबई



