Hindjagarnews – Reporter – Pune – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मधील भाजपने तीन दिवसापूर्वी ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये शहरातील कोथरूडमधून चंद्रकांत पाटील,पर्वती विधानसभा मतदार संघामधून माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून सिद्धार्थ शिरोळे या तीन विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली होती.मात्र पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे आणि खडकवासला मतदार संघाचे भीमराव तापकीर विद्यमान आमदारांच्या नावाची घोषणा झाली नाही.त्यामुळे त्या दोन्ही आमदाराचे टेंशन वाढले आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली नाही.तर दुसर्या बाजूला महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या देखील जागावाटपा बाबत बैठका सुरू आहेत.उद्या सायंकाळपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपा बाबत चित्र स्पष्ट होईल,असे बोलले जात आहे.
पण त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.त्यामध्ये हडपसर येथून शहर अध्यक्ष साईनाथ बाबर,कोथरूड येथून किशोर शिंदे आणि मनसेचे आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.शहरातील आठ विधानसभा मतदार संघातून केवळ तीन उमेदवार सध्या तरी जाहीर केले आहेत.येत्या कालावधीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे किती उमेदवार जाहीर करतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.
पुणे शहरातील मनसेच्या तीन उमेदवारांमध्ये मयूरेश वांजळे हे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत.त्यांचे वडील आमदार रमेश वांजळे यांची ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळख होती. २००९ मध्ये खडकवासला मतदारसंघातून ते मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. आमदार असताना त्यांनी मनसे स्टाइलने अनेक आंदोलने केली आणि विधिमंडळ देखील त्यांनी चांगलेच गाजवले होते.तर २०११ मध्ये रमेश वांजळे यांचे निधन झाले.तर
त्यांची कन्या सायली वांजळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर २०१७ ते २०२२ दरम्यान नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. तसेच हडपसर विधानसभा मतदार संघातून मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोंढवा भागातून २०१७ ते २०२२ पर्यंत आणि त्यांची पत्नी २०१२ ते २०१७ दरम्यान नगरसेविका राहिल्या आहेत.त्याचबरोबर अॅड किशोर शिंदे हे दोन वेळेस नगरसेवक आणि तीन वेळा कोथरूड येथून विधानसभा निवडणुक लढवली आहे..त्या तीन निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
—– Ganesh Maruti Joshi.