HindJagar News – Reporter – Pune – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी मंत्रालयातून झालेल्या बदल्यांमध्ये निवृत्तीच्या टप्प्यातील अधिकाऱ्यांनाही हटवल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.पुण्याच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात गुणनियंत्रण कक्षाचे कृषी अधिकारी अनिल डोईफोडे हे तीन महिन्यांनंतर निवृत्त होणार होते. मात्र डोईफोडे यांना हटवून त्यांच्या पदावर अतुल गणपतराव जाधव यांना नेमण्याचे आदेश मंत्रालयातून देण्यात आले. जाधव आधी कोल्हापूरच्या करवीर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी होते. त्यांनी गुणनियंत्रणपदावर काम मिळावे, अशी विनंती राज्य शासनाकडे केली होती. ती मान्य करण्यात आली, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकारामुळे नाराज झालेल्या श्री. डोईफोडे यांनी थेट महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाकडे (मॅट) याच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, श्री. जाधव हे कोल्हापूरमधील गुणनियंत्रण कक्षासाठी प्रयत्नशील होते. परंतु मंत्रालयातून तेथे दुसऱ्याच अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेली. त्यामुळे नाराज झालेल्या जाधव यांनी पुन्हा मंत्रालयात दाद मागितली. जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी पुण्यातील श्री. डोईफोडे यांना हटवून तेथे श्री. जाधव यांचे पुनर्वसन केले आहे.
दुसऱ्या बाजूला अमरावतीच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील गुणनियंत्रण कक्षातदेखील सध्या गोंधळ चालू आहे. तेथील तंत्र अधिकारी राजेश संपतराव जानकर हे आठ महिन्यांत निवृत्त होणार होते. मात्र, त्यांची बदली करण्याचे आदेश मंत्रालयातून काढण्यात आले. जानकर यांचे गुणनियंत्रणचे काम काढून घ्यावे व कृषी सहसंचालक कार्यालयात इतर कक्षातील तंत्र अधिकारीपद द्यावे, असे मंत्रालयातून सांगण्यात आले. जानकर यांचे गुणनियंत्रणचे पद आता अकोला उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी नितीन लोखंडे यांना द्यावे, असेही मंत्रालयातून सांगण्यात आले आहे.विशेष म्हणजे श्री. जानकर यांचा बदलीसाठी विनंती अर्ज नव्हता. तसेच, सध्याच्या पदावर त्यांना तीन वर्षे पूर्ण झालेली नव्हती. श्री. जाधव यांचीही नुकतीच बदली झाली होती व पुन्हा केवळ तीन महिन्यांत गुणनियंत्रण पद दिले जात होते. श्री. जानकर यांनी हा सारा गोंधळ मॅटसमोर मांडला. मॅटने हा मुद्दा गंभीर असल्याचे मान्य करून जानकर यांच्या बदलीस स्थगिती दिली आहे.
जानकर पुन्हा ‘गुणनियंत्रण’कडे
‘मॅट’ने स्थगिती आदेश देताच राजेश जानकर यांनी अमरावतीच्या जेडीए कार्यालयातील गुणनियंत्रण कक्षाचा पुन्हा ताबा घेतला आहे. तर या पदावर दावा सांगणाऱ्या नितीन लोखंडे यांना निवडणूक आचारसंहितेमुळे सध्या कोणतेही पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा वाद सध्या राज्यभर चर्चेत आहे.
Repoter – Ganesh Maruti Joshi.