HindJagar News – Repoter – PUNE – राजकारणात संस्कारी असणाऱ्यांची, महिलांची प्रतिष्ठा राखणाऱ्यांची सर्वाधिक आवश्यकता आहे. सिद्धार्थ शिरोळे राजकारणातील संस्कारी चेहरा आहेत, असे कौतुकोद्गार भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काढले.छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर गावठाण येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात मुंडे बोलत होत्या.
श्री रोकडोबा देवस्थान सभागृह परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यासाठी सुजाता सिद्धार्थ शिरोळे, पक्षाच्या प्रदेशसचिव अॅड. वर्षा डहाळे, महिला मोर्चा पुणे शहर अध्यक्षा हर्षदा फरांदे, निवेदिता एकबोटे, शिवाजीनगर महिला आघाडी अध्यक्ष अपर्णा कुऱ्हाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या लावण्या शिंदे, माजी नगरसेविका स्वाती लोखंडे, महिला आघाडी शहर सरचिटणीस भावना शेळके, अपर्णा कुऱ्हाडे, लता धायगुडे, शारदा पुनावळे, श्रद्धा शिंदे, अर्चना मुसळे उपस्थित होत्या
मला लाखोंच्या सभेपुढे बोलताना कायमच झाशीच्या राणीचे रूप घ्यावे लागते आज शिवाजीनगर येथे होत असलेल्या या मेळाव्यात मला बोलण्यातला गोडवा, सहजता आणि बहिणींशी गप्पा मारल्याचे सुख अनुभविता आले, याचा आनंद पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
आपले वडील गोपीनाथ मुंडे यांचा सिद्धार्थ शिरोळे यांचे वडील अनिल शिरोळे यांसोबत असलेला ऋणानुबंध आणि मैत्रीचे नाते याच्या अनेक आठवणी पंकजा यांनी जागविल्या. यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या, “जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा घरोघरी शौचालय ही योजना जाहीर केली. भारतीय जनता पक्ष हा स्त्रियांचा सन्मान करणारा पक्ष असून याच पक्ष शिस्तीत सिद्धार्थ यांची जडणघडण झाली आहे. शिवाजीनगर मतदार संघात त्यांना दुसऱ्यांदा देण्यात आलेली संधी हे त्यातेच द्योतक असून त्यांच्या विजयासाठी महिलांनी पुढे सरसवा.”
आजवर स्त्रीने खूप चटके सहन केले असून एका स्त्रीसाठीच रामायण महाभारत घडले आहे. आजच्या कलयुगातही स्त्रीचा हा लढा संपला नसून आज तिची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. स्त्रीयांची ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने आणलेली ‘लाडकी बहिण’ योजना ही खऱ्या अर्थाने स्त्रियांचे सक्षमीकरण करणारी योजना आहे, असेही मुंडे यांनी नमूद केले.
या आधी सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ मतदार संघातील विविध भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोखलेनगर, कपिला सोसायटी, मंगलवाडी, रामोशी वाडी, चाफेकर पुतळा, वाकडेवाडी, शिवाजीनगर रेल्वे स्थानक, भैय्यावाडी या ठिकाणी सर्व स्तरातील, वयोगटातील नागरिकांच्या भेटी शिरोळे यांनी घेतल्या. या भेटीदरम्यान वयोवृद्ध नागरीकांनी शिरोळे यांना आशीर्वाद दिले तर लहानग्यांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. शिरोळे यांनीही या मुलांचा हट्ट पुरविला.
——– प्रदीप कांबळे .