HindJagar News – Repoter – PUNE – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत होती. पुढील दोन दिवस काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट असू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच दुसरीकडे ऐन थंडीत पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.फेंगल चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम अजुनही हवामानावर दिसून येत आहेत.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्य़ा आणि तामिळनाडूसह देशातील प्रामुख्याने दक्षिण किनारपट्टी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे हवामान प्रणालीत हे बदल झाल्याचं सांगितलं जात आहे. चक्रीवादळामुळे तयार झालेले बाष्पयुक्त वारे सध्या थेट राज्याच्या दिशेनं येत असल्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरनिर्मिती होत असून, काही क्षेत्रांमध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. याच कारणास्तव राज्यात तग धरलेल्या थंडीवरही परिणाम होत असून, तापमानवाढ नोंदवली जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रिमझिम पावसाच्या सरी बरसतील. तसेच (दि. 03 डिसेंबर ते 04 डिसेंबर) रोजी पावसाचा जोर वाढेल. याबरोबरच विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आजपासून तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि घाटमाथा या भागात यलो अलर्ट जारी केला आहे.
याबरोबरच 5 नोव्हेंबर रोजी पुन्हा पावसाचा जोर कमी होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असं असलं तरीही उत्तर महाराष्ट्रातील गारठा मात्र कायम राहणार असून, हे क्षेत्र या बदलांच्या स्थितीत अपवाद ठरणार आहे. दरम्यान, चक्रीवादळाचा परिणाम संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच साधारण 8 डिसेंबरनंतर राज्यात पुन्हा एकदा दडी मारून बसलेली थंडी जोर धरताना दिसणार आहे.
——– Ganesh Maruti Joshi.